रुपया मूल्यवर्धनाच्या दिशेने पाऊल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमेरिकेने र्निबध लादलेल्या इराणमधून आयात होणाऱ्या खनिज तेलाची किंमत रुपयामध्ये चुकती करण्याचा व्यवहार भारताने निश्चित केला आहे. यापूर्वी या व्यवहाराकरिता युरो चलनाचा वापर होत होता.

भारताच्या यूको बँक व आयडीबीआय बँक या सरकारी बँकांच्या माध्यमातून हा चलन व्यवहार तेल आयातीकरिता होणार आहे. भारतातील सार्वजनिक तेल व वायू विक्री व विपणन कंपन्यांमार्फत इराणमधून आयात होणाऱ्या तेलाचे देयक ६० दिवसांत चुकते करावे लागते.

इराणसाठी तेल खरेदीदार म्हणून चीननंतर भारत हा दुसरा मोठा देश आहे. चालू वित्त वर्षांत भारत इराणमधून २.५० कोटी टन तेल आयात करेल. अमेरिकेने इराणवर लादलेले र्निबध ४ नोव्हेंबरपासून अंमलात येणार आहेत. भारताने इराणकडून तेल आयात बंद करावी असा अमेरिकेचा आग्रह आहे.

मात्र सरकारच्या निर्णयानुसार, आयात खनिज तेलाकरिता नोव्हेंबरपासून भारतीय चलन अर्थात रुपयात व्यवहार केले जातील. यामुळे अप्रत्यक्षपणे अमेरिका तसेच युरोपीय बँकांनाही आव्हान दिले जाणार आहे. देशाच्या विदेशी चलन गंगाजळीवर अतिरिक्त भार पडणार नाही. रुपयाच्या विनिमय मूल्याच्या मजबुतीकरिता ही बाब उपकारक ठरणार आहे.

भारतीय तेल कंपन्या सध्या स्टेट बँक जसेच जर्मनीस्थित बँकांच्या माध्यमातून इराणबरोबर आयात तेलासाठीचे व्यवहार करतात. मात्र नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या व्यवहारात स्टेट बँक सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. आखातातील काही देश, तेलाच्या बदल्यात भारताकडून काही वस्तूंची आयात रुपयातील चलन विनिमयाने करीत आहेत.

रुपयावर दबाव कायम राहणार – डी अँड बी

भारताच्या  चलनावर आंतरराष्ट्रीय घडामोडींचा विपरित परिणाम होत असून नजीकच्या कालावधीत हा दबाव कायम असेल, असा अंदाज डन अँड ब्रॅडस्ट्रीटने संशोधनपर अहवालात व्यक्त केला आहे. संस्थेचे भारतातील अर्थतज्ज्ञ अरुण सिंह यांच्या मते, भक्कम अमेरिकी डॉलरबरोबरच, भू-राजकीय तणाव, आर्थिक र्निबध आदी घटक रुपयातील आणखी घसरणीकरिता कारणीभूत ठरू शकतील. रुपयाला आधार म्हणून विदेशी गुंतवणूक आकर्षित करणाऱ्या उपाययोजनांचा मर्यादित परिणाम दिसेल. केंद्र सरकारने अधिक ठोस उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे त्यांचे मत आहे.

आयात शुल्कासाठी डॉलरचा दर ७३.६५ रुपये निश्चित

आयात शुल्क निर्धारणासाठी प्रति डॉलर ७३.६५ रुपये या प्रमाणे विनिमय मूल्य ठरविल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. ही अंमलबजावणी २१ सप्टेंबरपासून होईल, असेही नमूद करण्यात आले आहे. पंधरवडय़ापूर्वी आयात शुल्काकरिता ७२.५५ रुपये प्रमाणे डॉलरचे मूल्य निश्चित करण्यात आले होते. तर पौड स्टर्लिगकरिता आधीच्या ९४.३० रुपयांऐवजी ९७.४० रुपयांप्रमाणे व्यवहार होतील,  असे अर्थ खात्याने गुरुवारी जाहीर केले. चलन विनिमय दरात गेल्या काही दिवसांत तीव्र हालचाल नोंदली गेली आहे. या डॉलरच्या तुलनेत रुपया ७३ पर्यंत पोहोचला आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India to pay in rupees for iranian oil
First published on: 21-09-2018 at 01:59 IST