भारतात पर्यावरणपूरक हरित (ग्रीन बििल्डग)  इमारतींबद्दल विकासक आणि वास्तुविशारद यांच्या दरम्यान वाढती जागरूकता दिसत असून आर्थिकदृष्टय़ा परवडणारी आणि ऊर्जा कार्यक्षम हरित बांधकाम व्यावसायिक पुढाकार घेत आहेत. त्यामुळे २०२५ पर्यंत भारत पर्यावरपूरक इमारतींचे जगातील प्रमुख केंद्र बनेल, असा विश्वास या क्षेत्रातील तज्ज्ञांनी मुंबईत झालेल्या ‘आर्किटेकट्रॉनिक्स’ या परिषदेत व्यक्त केला.

स्थावर मालमत्ता विकासक, वास्तुविशारद, या विषयातील विद्यार्थी-अभ्यासक आणि बांधकाम क्षेत्रातील प्रतिनिधींचा सहभाग असलेल्या ‘आर्किटेकट्रॉनिक्स’ या दिवसभराच्या परिसंवादाचे आयोजन ‘इंडियन सोसायटी ऑफ हीटिंग, रेफ्रिजरेटिंग, एअर कंडिशिनग इंजिनीयर्स’ अर्थात ‘इशरे’ या संस्थेकडून करण्यात आले होते. इशरेच्या मुंबई विभागाचे अध्यक्ष मिहिर संघवी यांच्या मते, भारतात ऊर्जा-कार्यक्षम इमारती उभारण्यावर भर दिला जात आहे आणि सरकारकडूनही पर्यावरणपूरक इमारतींना कर सवलतींच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्यात येत आहे. यामुळे देशात पोषक वातावरण तयार होऊन, नजीकच्या काळात हरित इमारतींमध्ये जागतिक बाजारपेठेत आघाडी घेण्याच्या दिशेने  भारताची वाटचाल सुरू आहे.

‘कॅम्पस नियोजन आणि रचना’ या विषयावर बोलताना प्रसिद्ध वास्तुविशारद हिरेन सेठी यांनी वाऱ्याच्या नैसर्गिक प्रवाहाचा कार्यक्षम वापर केल्यास वातानुकूलन यंत्रांचा वापर २० ते २२ टक्क्यांनी कमी केला जाऊ शकतो, असे सांगितले. इमारतीच्या बांधकामासंदर्भात बाह्य़ सौंदर्यासह प्रत्येक बाबीचे विश्लेषण आता लोक करू लागले आहेत. गेल्या आठ ते १० वर्षांत भारतात मोठय़ा प्रमाणात ग्रीन अर्थातच पर्यावरणपूरक बांधकामे झाली आहेत. आज भारतातील सुमारे ४,९०० प्रकल्पांमध्ये (तब्बल ६.४ अब्ज चौरस फूट क्षेत्रफळाच्या) पर्यावरणपूरक बांधकामे सुरू आहेत. यातील १,४०० प्रकल्प एकटय़ा महाराष्ट्रात असल्याचे त्यांनी सांगितले. या गतीने सध्या तिसऱ्या स्थानावर असलेले भारत हे हरित बांधकामांमध्ये लवकरच अग्रस्थान मिळविताना दिसेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.