‘आयआरडीएआय’ अध्यक्षांचे प्रतिपादन

मुंबई :  विमा उद्योगातील विवेक कायम राखण्यामध्ये विमागणिती (अ‍ॅक्च्युअरीज) यांचे मोलाचे योगदान अधोरेखित करताना, विमा व्यवसायाची सुरू असलेली वाढ पाहता नजीकच्या काळात देशाला किमान १,००० पात्र विमागणितींची गरज आहे, असे प्रतिपादन भारतीय विमा नियमन व विकास प्राधिकरण अर्थात आयआरडीएआयचे अध्यक्ष डॉ. सुभाष चंद्र खुंटिया यांनी येथे व्यक्त केले. एकविसाव्या ग्लोबल कॉन्फरन्स ऑफ अ‍ॅक्च्युअरीजच्या (जीसीए) या परिषदेच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते.

विमागणितींचे विशेष कौशल्य नमूद करत खुंटिया यांनी पारंपरिक चाकोरीबाहेर जाऊन हे काम करण्याचे आणि त्याद्वारे महत्त्वाची भूमिका बजावण्याचे आवाहन या व्यावसायिकांना केले. उत्पादनात नावीण्य साधणे, नियमनात्मक उपक्रम व लोकांच्या आवडीचे कार्यक्रम आयोजित करणे यात त्यांची प्रधान भूमिका असायला हवी. अन्य देशांच्या तुलनेत आपल्याकडे दरडोई विमागणितींची संख्या लक्षणीय कमी आहे आणि विविध उद्योगांना व क्षेत्रांना सेवा द्यायची असेल तर भारतात किमान १,००० पात्र अ‍ॅक्च्युअरीजची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. जगभरातील वित्तीय सेवांतील ७५० हून अधिक पाहुण्यांनी जीसीएच्या या परिषदेला हजेरी लावली आहे.