आंतरराष्ट्रीय स्तरावर घसरलेल्या तेलाच्या किमती आणि भारतासारख्या देशात सुरू असलेली हवाई प्रवासी तिकीटदर कमीत कमी राखण्याची स्पर्धा या बाबी देशांतर्गत विमान कंपन्यांच्या पथ्यावर पडणाऱ्या असून येत्या दोन दशकांत जागतिक स्तरावर कंपन्यांना आवश्यकता भासणाऱ्या विमान मागणीत भारताचा ४.५ टक्के हिस्सा राहील, असा विश्वास उद्योगाला लागणाऱ्या सर्वात मोठय़ा विमान पुरवठादार कंपनी- बोइंगने व्यक्त केला आहे.
अमेरिकी कंपनी बोइंगच्या आशिया पॅसिफिक व भारताच्या विक्री विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. दिनेश केसकर यांनी गुरुवारी मुंबईत सांगितले की, बोइंगसह अन्य कंपन्यांच्या एकूण विमानांची जागतिक मागणी २०३४ पर्यंत ३८,०५० असेल. पैकी १,७४० विमानांसह भारताचा हिस्सा ४.५ टक्केराहील.
अमेरिकी डॉलरनुसार ही मागणी २४० अब्ज डॉलर असून त्याबाबतही देशाचा हिस्सा जागतिक तुलनेत ४.३ टक्के असल्याचे केसकर म्हणाले.
भारतीय हवाई क्षेत्रातील मागणी आणि पुरवठा याबाबतचे गणित मांडताना केसकर म्हणाले की, खर्च वाढता असताना तिकिटांचे दर कमी करणे तसे जोखमीचे असते. मात्र गेल्या काही कालावधीमध्ये इंधनाचे दर कमालीचे खाली आले असून या क्षेत्रात हवाई प्रवासी सेवेकरिता नव्या कंपन्यांही उतरल्या आहेत. अशा स्थितीत उलट कंपन्यांकडून वाढत्या विमानांसाठीची मागणीच नोंदली जाईल. खनिज तेलाचे प्रति पिंप १५० डॉलर असे २००८ मधील दर आता ४३ डॉलरवर आले असल्याकडे लक्ष वेधताना केसकर यांनी हे हवाई उद्योगासाठी शुभसूचक असल्याचे सांगितले.

फिनिक्स भरारीचे बळ..
भारतासारख्या देशात मध्यमवर्गीयांची संख्याही २० कोटींच्या पुढे गेली आहे, असे नमूद केले. नव्या अथवा पुनरुज्जीवित झालेल्या भारतीय हवाई कंपन्यांना कमी होत असलेल्या इंधन दराचे पूरक साहाय्य मिळत असून अशा कालावधीत त्यांच्याकडून कमी दरातील तिकीट विक्रीची स्पर्धा एकूणच भारतीय हवाई क्षेत्रासाठी मंदीतून ‘फिनिक्स’ भरारी घेण्याचे बळ देणारे ठरेल.