आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून कौतुक; ७.३ टक्के विकासदराचा अंदाज

वॉशिंग्टन : चालू वर्षांत ७.३ टक्के तर पुढील वर्षांत ७.४ टक्के विकास दराबाबतचा आशावाद व्यक्त करतानाच जगातील सर्वात वेगवान अर्थव्यवस्था म्हणून भारत आपले स्थान कायम राखेल, असा विश्वास आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केला आहे.

भारताचा विकासरथ वेगाने वाढण्यासह तो चीनला जवळपास एक टक्क्याने मागे टाकणारा असेल, असेही नाणेनिधीने आपल्या ताज्या जागतिक अहवालात भाकीत केले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जागतिक अर्थव्यवस्थेचा वेग ३.७ टक्के असेल, असे म्हटले आहे.

२०१७ मध्ये भारताचा आर्थिक विकास दर ६.७ टक्के राहिला आहे. तर चालू आर्थिक वर्षांतील पहिल्या तिमाहीत तो ८.२ टक्के नोंदला गेला आहे.

महागाई नियंत्रण आराखडा, वस्तू व सेवा करप्रणाली, नादारी आणि दिवाळखोरी संहिता तसेच विदेशी गुंतवणूक वाढविण्यासाठीच्या उपाययोजना, सुलभ व्यवसायासाठीचे पूरक वातावरण अशा उपाययोजनां, भारताचे कौतुक करताना नाणेनिधीने जागतिक स्तरावर मात्र वाढत्या इंधनाच्या किमतीचा विपरीत परिणाम आर्थिक विकासावर राहील, असे नमूद केले आहे.