९.१५ टक्क्य़ांपर्यंत गृहकर्ज स्वस्त!

गृहकर्जावरील व्याजदर कपातीची बँका व वित्तसंस्थांमध्ये सुरू असलेली चढाओढ ही घरासाठी कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासादायी ठरताना दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी गृहकर्जावरील सध्याचा सर्वात कमी ९.१५ व्याजदर स्टेट बँकेने जाहीर केला, तर शुक्रवारी इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स या खासगी क्षेत्रातील दुसऱ्या मोठय़ा गृहवित्त संस्थेने त्याची बरोबरी साधत नवीन गृहकर्जासाठी व्याजदर ९.१५ टक्क्य़ांवर आणले आहेत.

स्टेट बँक, एचडीएफसी लि. आणि आयसीआयसीआय बँकेपाठोपाठ, इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्सने गृहकर्जावरील व्याजाचे दर ०.१५ टक्क्य़ांनी खाली आणत, त्याची अंमलबजावणी शुक्रवारपासून सुरू करीत असल्याचे प्रसिद्धीपत्रकान्वये जाहीर केले आहे. त्यानुसार, २८ लाख रुपर्यंत घरासाठी कर्ज घेणारे ग्राहकांना ९.१५ टक्के व्याजदर आकारण्यात येणार आहे. महिला ग्राहकांसाठी या व्याजदराने कर्जाची कमाल मर्यादा ७५ लाख रुपयांपर्यंत ठेवण्यात आली आहे. सुधारीत व्याजदरानुसार आता गृहकर्जदारांना प्रत्येक लाख रुपये कर्जामागे ८१५ रुपये इतका अल्पतम मासिक हप्ता पडेल, असा इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्सचा दावा आहे.

इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्सकडे २८ लाख रुपयांपेक्षा अधिक कमाल ७५ लाख रुपयांपर्यंतच्या घरासाठी कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना (अर्जदार महिला नसल्यास) ९.२० टक्के व्याजदर पडेल. तर त्यापुढील रकमेच्या गृहकर्जासाठी, महिला अर्जदार असल्यास ९.३० टक्के व अन्य ग्राहकांना ९.३५ टक्के व्याजदर आकारला जाईल.

घरांसाठी कर्ज देणारी सर्वात मोठी वित्तसंस्था एचडीएफसी लिमिटेडने गुरुवारी आपल्या गृहकर्जदारांना दिलासा देताना, व्याजदरात ०.१५ टक्के कपात जाहीर केली आहे. बुधवारी स्टेट बँक आणि आयसीआयसीआय बँकेनेही याच प्रमाणात कपात केली आहे. एचडीएफसीचे व्याजदर हे ७५ लाखांपर्यंतच्या गृहकर्जावर आता सामान्य ग्राहकांसाठी ९.२० टक्के तर महिला ग्राहकांकरिता ९.१५ टक्के असे असतील. नव्याने गृहकर्ज घेणाऱ्या ग्राहकांना ते लागू होतील. आयसीआयसीआय बँकेने ७५ लाख रुपयांच्या गृहकर्जासाठी सर्वच ग्राहकांसाठी ९.१५ टक्के व्याजदर आकारण्याची घोषणा केली आहे. स्टेट बँकेने मात्र महिला ग्राहकांना ९.१० टक्के व्याजदराने गृहकर्ज देऊ केले आहे.