विमा हप्ते संकलनात ३० टक्के वाढ अपेक्षित

जीवन विमा क्षेत्रातील खासगी कंपनी इंडियाफर्स्ट लाइफ इन्शुरन्सने चालू आर्थिक वर्षांत १०,००० कोटी रुपयांच्या मालमत्ता व्यवस्थापनाचे ध्येय राखले आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदा, आंध्रा बँक आणि लीगल अॅन्ड जनरल कंपनीच्या भागीदारीतून खासगी जीवन विमा क्षेत्रात अस्तित्वात आलेल्या इंडियाफर्स्टने मार्च २०१६ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षांत ९,०६१ कोटी रुपयांच्या मालमत्तेचे व्यवस्थापन हाताळले आहे. ते मार्च २०१७ अखेर १०,००० कोटी रुपये होईल, असा विश्वास कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिक व मुख्य कार्यकारी अधिकारी आर. एम. विशाखा यांनी व्यक्त केला आहे.
सलग दुसऱ्या वर्षी नफ्याची नोंद करणाऱ्या कंपनीने विमा हप्ता संकलनाचे ३० टक्के वाढीसह २,००० कोटी रुपयांचे लक्ष्यही यानिमित्ताने निर्धारित केले आहे. कंपनीला गेल्या आर्थिक वर्षांत ७.७२ कोटी रुपयांचा नफा झाला असून तो वार्षिक तुलनेत १२ टक्के अधिक आहे.
कंपनीने गेल्या आर्थिक वर्षांत सादर केलेल्या ‘गॅरंटीड रिटायरमेंट प्लॅन’ला मिळालेल्या प्रतिसादाच्या जोरावर यंदा लक्षणीय नफ्याची नोंद झाल्याचे स्पष्ट करत विशाखा यांनी यामुळे अवघ्या तीन महिन्यांत ३१.६० कोटी रुपयांचे हप्ता संकलन झाल्याचे सांगितले.
कंपनीच्या सध्याच्या नफ्यापेक्षा तिप्पट हप्ता संकलन करण्याचे ध्येय विशाखा यांनी नमूद केले. भविष्यातही कंपनी ग्राहककेंद्रित व्यवसायावर भर देईल, असेही त्या म्हणाल्या.