४,००० कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचे संकट

अमेरिकी वाहन निर्माती कंपनी फोर्डने भारतातील दोन्ही उत्पादन प्रकल्प बंद करीत व्यावसायिक गाशा गुंडाळण्याचे संकेत दिले आहेत. व्यवसाय पुर्नरचना योजनेंतर्गत भारतात कंपनीकडून फक्त आयात केलेली वाहने विकली जाणार आहेत. सुमारे ४,००० भारतीय कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गंडांतर आले आहे.

फोर्डने भारतातील चेन्नई आणि साणंद (गुजरात) येथे असलेल्या उत्पादन प्रकल्पात सुमारे २.५ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. या प्रकल्पातून फोर्डची इकोस्पोर्ट, फिगो आणि एस्पायर या वाहनांची निर्मिती केली जाते. तथापि, हे प्रकल्प पूर्णपणे बंद करण्याबाबत कंपनीकडून लवकरच अधिकृत घोषणा केली जाईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. कंपनी येथून पुढे फक्त फोर्ड मस्टँग हे वाहन भारतात आयात करून विकेल, अशी शक्यताही सूत्रांनी वर्तविली.

करोनाची जगभरातील वाहन निर्मिती क्षेत्राला मोठी झळ बसली आहे. भारतातदेखील सेमीकंडक्टरच्या कमतरतेमुळे काही वाहन कंपन्यांनी काही दिवसांसाठी उत्पादन थांबविले आहे. फोर्डदेखील भारतीय बाजारपेठेत टिकून राहण्यासाठी झगडत आहे.

फोर्ड इंडियाच्या उत्पादन प्रकल्पांची वर्षाला ६.१० लाख वाहनांचे इंजिन उत्पादन आणि ४.४० लाख वाहनांच्या निर्मितीची क्षमता आहे. यामध्ये फिगो, एस्पायर आणि इकोस्पोर्टसारख्या वाहनांची जगभरातील ७० हून अधिक बाजारपेठांमध्ये निर्यातही केली जाते.

चालू वर्षात जानेवारीमध्ये फोर्ड मोटर कंपनी आणि महिंद्र अँड महिंद्रने संयुक्त उपक्रम रद्द करण्याचा निर्णय घेऊन, स्वतंत्रपणे कामकाजाची वाट चोखाळत असल्याचे जाहीर केले. ऑक्टोबर २०१९ मध्ये उभयतांमध्ये झालेल्या करारानुसार महिंद्र अँड महिंद्रकडून अमेरिकी फोर्ड मोटरची भारतातील उपकंपनी असलेल्या फोर्ड इंडियाची बहुतांश हिस्सेदारी खरेदी केली जाणार होती.

जनरल मोटर्सनंतर भारतातील उत्पादन प्रकल्प बंद करणारी फोर्ड ही दुसरी अमेरिकी कंपनी आहे. जनरल मोटर्सने २०१७ मध्ये भारतातील व्यवसाय आवरता घेतला. गेल्या दोन दशकांपासून अस्तित्व राखूनही बाजारहिस्सा वाढवण्यात अपयश आल्याने कंपनीने हा निर्णय घेतला. जनरल मोटर्सने गुजरातमधील हलोल येथील उत्पादन प्रकल्प एमजी मोटर्सला विकला. तसेच काही काळ सुरू असलेल्या तळेगाव (पुणे) येथील प्रकल्पदेखील पुढे बंद केला.

९० टक्के कर्मचाऱ्यांना नारळ दिला जाणार!

फोर्ड इंडियाने दोन्ही उत्पादन प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतल्याने त्याचा कंपनीच्या ४००० कर्मचाऱ्यांना फटका बसणार आहे. साणंद येथील उत्पादन प्रकल्पात फक्त ५०० कर्मचाऱ्यांच्या मदतीने इंजिन निर्मितीचे काम सुरू राहील. तर अन्य १०० कर्मचारी भारतातील वितरण आणि ग्राहकसेवा विभागात कार्यरत राहतील. फोर्डने देशातील उत्पादन बंद केले असले तरी विद्यमान ग्राहकांना विक्रीपश्चात सेवा, वाहनांचे सुटे भाग व दुरुस्ती आणि इतर नित्य सेवा सुरू राहणार आहेत.