सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन बँकने गुरुवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला बँकेच्या तीन खात्यांसंदर्भात माहिती दिली आहे. या तीन खात्यांवरुन बँकेची फसवणूक झाल्याचे सांगण्यात आलं असून ही खाती तुंबलेल्या कर्जपरतफेडीच्या आधारे अनुत्पादित मालमत्ता (एनपीए) म्हणून घोषित करण्यात आली आहे. या तिन्ही खात्यांकडून बँकांना ३५ कोटींहून अधिक थकीत कर्जवसुली होणं बाकी आहे. बँकेने शेअर बाजारामध्येही या खात्यांच्या फसवणुकीसंदर्भात माहिती दिली आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियमावलीनुसार ही माहिती देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

इंडियन बँकने शेअर बाजारांना पाठवलेल्या माहितीनुसार त्यांनी अनुत्पादित मालमत्ता (एनपीए) यादीमध्ये टाकलेल्या खात्यांमध्ये एस. कुमार्स नेशनवाइड लिमिटेड, प्रिया लिमिटेड आणि युवराज पॉवर प्रॉजेक्ट या तीन कंपन्यांचा समावेश आहे. बँकांसंदर्भात रिझर्व्ह बँकेच्या नियमांप्रमाणे ही माहिती देण्यात आली आहे. बँकेने या तिन्ही खात्यांवरुन बँकेला एकूण ३५ कोटी २९ लाख रुपये येणं बाकी असल्याचं म्हटलं आहे. यासंदर्भातील वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

बँकेने दिलेल्या माहितीनुसार एस कुमार्स नेशनवाइड लिमिटेडकडून १४ कोटी ५१ लाख रुपये, प्रिया लिमिटेडकडून नऊ कोटी ७३ लाख रुपये आणि युवराज पॉवर प्रोजेक्टकडून ११ कोटी पाच लाख रुपये थकवण्यात आले आहेत. बँकेने दोन कंपन्यांनी एक रुपयाही बँकेला परत दिला नसून १०० टक्के रक्कम येणं बाकी असल्याचं सांगितलं असून एका बँकेकडून नऊ कोटी ७३ लाख रुपये येणं बाकी असल्याचं म्हटलं आहे.

एनपीए म्हणजे काय?

एनपीए म्हणजे एखादी बँक एखाद्या खातेदाराला कर्ज म्हणून काही रक्कम देते. त्यानंतर काही काळाने त्या कंपन्यांकडून बँकांना थकित कर्ज आणि त्यावरील व्याज दिलं जात नाही. यामुळे बँकांना पैसे मिळणं बंद होतं. तसेच त्यांच्याकडून देण्यात आलेली रक्कम कायमची बुडीत निघण्याचीही शक्यता असते. एखाद्या खातेदाराने ९१ दिवस किंवा व्याज एका वर्षाहून अधिक काळ दिलं नाही तर ते कर्ज एनपीए म्हणून जाहीर केलं जातं. एनपीए म्हणजे बँकांना कायम स्वरुपी बसलेला आर्थिक फटका म्हणून पाहिले जाते.