सिंडिकेट बँकेकडून यंदा १५ टक्क्यांच्या माफक कर्जवाढीचे लक्ष्य
व्यापार प्रतिनिधी, मुंबई
सार्वजनिक क्षेत्रातील सिंडिकेट बँकेने चालू आर्थिक वर्षांसाठी कर्ज वितरणात १५ टक्के दराने म्हणजे सरलेल्या वर्षांतील १७ टक्क्यांपेक्षाही कमी वाढीचे माफक लक्ष्य निर्धारित केले असून, एकूणच बँकिंग वर्तुळात कर्ज वितरणाबाबत सावधगिरी आणि पतगुणवत्तेबाबत अतिव दक्षतेसाठी घेतल्या गेलेल्या पवित्र्याचाच प्रत्यय दिला आहे.
सिंडिकेट बँकेवर जवळपास वर्षभराच्या खंडानंतर मे अखेरीस अरुण श्रीवास्तव यांची व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सरकारकडून नियुक्ती करण्यात आली. पदभार सांभाळल्यानंतर प्रथमच माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना, २०१४-१५ सालात कर्ज वितरणात साधली गेलेली १७ टक्क्यांची वाढ ही असाधारणच होती, अशी त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. एकूण बँकिंग क्षेत्रात २०१४-१५ सालात १२.६ टक्के दराने कर्ज वितरणात वाढ साधण्यात आली आहे.
प्रकल्प खोळंबा निस्तरण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू असले तरी चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत बँकेकडे कोणताही प्रकल्प कर्जमागणीसाठी अद्याप आलेला नाही, असे श्रीवास्तव यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. पावसाळा सुरू झाला असला तरी कृषी कर्जातही लक्षणीय वाढ दिसत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तथापि बँकेचा येत्या काळात कृषी तसेच लघू व मध्यम उद्योगांवरच प्रामुख्याने भर असेल, तर बँकेच्या व्यावसायिक वृद्धीचा आधार असेल. तुटीच्या पावसाच्या कयासांमुळे कृषी क्षेत्रात आव्हानात्मक स्थिती उद्भवली तरी कर्ज वितरणाचे निर्धारित लक्ष्य गेल्या वर्षांप्रमाणे गाठले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कर्नाटक, आंध्र, तेलंगण, महाराष्ट्र या शेतीसाठी अग्रेसर राज्यात सिंडिकेट बँकेचा चांगला पाया असून, याच भागातून बँकेच्या चालू व बचत खात्यांतून (कासा) ठेवींचे सर्वाधिक योगदान येते. कर्ज वितरणात एकूण सरासरीपेक्षा सरस कामगिरीसह सिंडिकेट बँकेनेही ठेवींच्या बाबतीतही १२.८ टक्के या बँकिंग उद्योगाच्या सरासरीच्या तुलनेत खूप अधिक म्हणजे २० टक्के दराने वाढ साधली. यातही सुधारणा अपेक्षित असून चालू वर्षांत ठेवींमध्येही १५ टक्के वाढीचे आपले लक्ष्य असल्याचे श्रीवास्तव यांनी सांगितले.
महाराष्ट्रात येत्या काळात ४० नव्या ठिकाणी शाखाविस्ताराचे नियोजन असल्याचे बँकेकडून सांगण्यात आले. महाराष्ट्रातून नुकताच बँकेने एक लाख कोटी रुपयांच्या व्यवसायाचा टप्पा गाठला, अशी माहिती सिंडिकेट बँकेच्या मुंबई क्षेत्राचे मुख्य महाव्यवस्थापक मंजुनाथ यांनी सांगितले.

‘एनकेजीएसबी’चा बंगळुरूत शिरकाव
व्यापार प्रतिनिधी, मुंबई<br />सहकार क्षेत्रातील आघाडीच्या एनकेजीएसबी सहकारी बँकेने आपल्या थेट दोन शाखांद्वारे दक्षिणेतील बंगळुरूत शिरकाव केला आहे. बँकेची राजाजीनगर व जयानगर येथील ही अनुक्रमे ९५ व ९६ वी शाखा आहे.
या उद्घाटनप्रसंगी एनकेजीएसबी बँकेचे अध्यक्ष किशोर कुलकर्णी, उपाध्यक्ष नागेश पिंगे, व्यवस्थापकीय संचालक सी. व्ही. नाडकर्णी, संचालक श्रीधर कामत, नागेश फोवकर, एस. पी. कामत, एल. टी. प्रभू, कौशल मुझुमदार, अनिल नाडकर्णी, राजन भट, मुख्य सरव्यवस्थापक पी. जी. कामत आदी उपस्थित होते.
९,००० कोटी रुपयांचा व्यवसाय मिळविणाऱ्या बँकेने यानिमित्ताने सप्टेंबर २०१५ पर्यंत १०,००० कोटी रुपयांचा टप्पा गाठण्याचा इरादा जाहीर केला. चालू वर्षांत बँकेने शाखांचे शतक पूर्ण करण्याचेही निश्चित केले आहे.

जनता सहकारी बँकेचा १० टक्के लाभांश
व्यापार प्रतिनिधी, मुंबई
पुणेस्थित जनता सहकारी बँकेने तिच्या सभासदांना १० टक्केलाभांश देण्याची घोषणा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या सभेत दिले.
एकूण ११,८२१.२४ कोटी रुपयांवर व्यवसाय पोहोचलेल्या जनता सहकारी बँकेची ६६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पुण्यात झाली. या वेळी ‘महाराष्ट्रभूषण’ पुरंदरे यांचा बँकेचे उपाध्यक्ष संजय लेले व संचालक सदस्य, सभासद, खातेदार यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला. बँकेने गेल्या आर्थिक वर्षांत ६४.६१ कोटी रुपयांचा नफा कमावला असल्याची माहितीही या वेळी बँकेचे अध्यक्ष अरविंद खळदकर यांनी दिली.
उलाढालीत १५.२९ टक्के वाढ नोंदविणाऱ्या या बँकेला रिझव्र्ह बँकेने नुकतीच १८ नव्या शाखा सुरू करण्यास परवानगी दिल्याची माहितीही या वेळी देण्यात आली.