अमेरिकी-चिनी कंपन्यांचा जागतिक वरचष्मा

जगातील आघाडीच्या २,००० कंपन्यांमध्ये भारतातील ५७ कंपन्यांना स्थान मिळाले असून ‘फोर्ब्स’ नियतकालिकाने तयार केलेल्या या सूचित रिलायन्स, एचडीएफसी अव्वल स्थानी आहेत.

अमेरिकेतील आघाडीच्या नियतकालिकातर्फे तयार करण्यात आलेल्या आघाडीच्या २,००० कंपन्यांमध्ये ‘इंडस्ट्रिअल अ‍ॅण्ड कमर्शिल बँक ऑफ चायना’ सलग सातव्या वर्षांत क्रमांक एकवर राहिली आहे.

भारतातील कंपन्यांबाबत रिलायन्स इंडस्ट्रीज जागतिक स्तरावर ७१ व्या स्थानी आहे. तर तेल व वायू क्षेत्रातील कंपनी म्हणून तिचे स्थान ११ वे आहे. एचडीएफसी लिमिटेड ही ग्राहक वित्त क्षेत्रात ७ व्या स्थानावर आहे. तर जागतिक क्रमवारीत तिचा क्रमांक ३३२ वा आहे.

पहिल्या २०० मध्ये स्थान मिळविणारी रिलायन्स इंडस्ट्रीज ही एकमेव भारतीय कंपनी ठरली आहे. तर २०९ व्या स्थानावर एचडीएफसी बँक आहे. ओएनजीसी (२२०), इंडियन ऑइल (२८८) यांचाही ‘फोर्ब्स’च्या यादीत भारतातील कंपन्या म्हणून समाविष्ट आहेत.

पहिल्या ५०० कंपन्यांच्या क्रमवारीत टीसीएस, आयसीआयसीआय बँक, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो, स्टेट बँक, एनटीपीसी तर प्रथम २,००० कंपन्यांमध्ये टाटा स्टील, कोल इंडिया, बीपीसीएल, इन्फोसिस, टाटा मोटर्स, विप्रो, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र, पंजाब नॅशनल बँक, ग्रासीम आदींचा क्रम आहे.

‘फोर्ब्स’च्या यादीत विविध ६१ देशांतील अनेक कंपन्यांचा समावेश आहे. पैकी सर्वाधिक, ५७५ कंपन्या या अमेरिकेतील आहेत. चीन, हाँग काँग आणि जपान त्याबाबत मागे आहेत. चीन व हाँग काँगमधील मिळून ३०९ कंपन्या या यादीत आहेत.

‘फोर्ब्स’च्या पहिल्या १० कंपन्यांमध्ये अमेरिका व चीनच्या प्रत्येकी पाच कंपन्या आहेत. जेपी मॉर्गन, बँक ऑफ अमेरिका, अ‍ॅप्पल, रॉयल डच शेल व वेल्स फॅर्गो आणि इंडस्ट्रिअल कमर्शिअल बँक ऑफ चायना, चायना कन्स्ट्रक्शन बँक, अ‍ॅग्रिकल्चरल बँक ऑफ चायना, पिंग एन इन्शुरन्स ग्रुप व बँक ऑफ चायना या त्या कंपन्या होत.