भारताच्या बाजारपेठेतील आधुनिक ‘ई-टेलिंग’च्या नवीन जोमात अ‍ॅमेझॉन, ईबे या आधुनिक ई-व्यापारातील बडय़ा जागतिक नाममुद्रा वाटेकरी बनण्यासाठी प्रयत्नशील असताना, याच वर्गवारीतील अस्सल भारतीय कंपनीने उलटी वाट चोखाळत, जगातील दोन बडय़ा अमेरिका आणि ब्रिटनच्या बाजारपेठेत पाय रोवण्याची किमया केली आहे. इतकेच नव्हे वैभव ग्लोबल लि. या मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजारात सूचिबद्ध कंपनीची या दोन बाजारपेठांमध्ये लवकरच अब्ज डॉलरच्या उलाढालीची वेस ओलांडण्याकडे वाटचाल सुरू असून, अमेरिकेच्या बाजारात सूचिबद्धतेचेही नियोजन आहे.
ब्रिटिश-अमेरिकन मध्यमवर्गीय स्त्री हा ग्राहकवर्ग समोर ठेवून जयपूरस्थित वैभव ग्लोबल तेथे फॅशन ज्वेलरी, घडय़ाळे, बॅगा, गृहसजावटीच्या वस्तूंच्या ई-पेठेत २००६ साली सुरुवात करीत चांगलाच जम बसविला आहे. कंपनीच्या मालकीची होम शॉपिंग टीव्ही वाहिनी ब्रिटन व अमेरिकेत असून त्या बरोबरीने ऑनलाइन, डिजिटल माध्यमातून ही १८ ते २० अमेरिकी डॉलर घरातील (स्पर्धक कंपन्यांच्या तुलनेत अतिशय स्वस्त) उत्पादनांची विक्री होती. वैभव ग्लोबलचे मुख्य वित्तीय अधिकारी हेमंत सुल्तानिया यांनी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या माहितीनुसार, टीव्ही वाहिन्यांमार्फत अमेरिकेतील ७७ दशलक्ष तर ब्रिटनमधील २३ दशलक्ष कुटुंबांपर्यंत कंपनीचा ग्राहकवर्ग फैलावला आहे.
जयपूरमधील २,००० कामगारांसह सुरू असलेल्या उत्पादन प्रकल्पातून ‘वैभव ग्लोबल’ची निम्मी उत्पादने मिळविली जातात, तर अन्य उत्पादने चीन, इंडोनेशिया, थायलंडमधून येतात. जयपूर प्रकल्पातून सध्याची दरमहा तीन लाख आभूषण निर्मितीक्षमता, लवकरच मोठय़ा गुंतवणुकीसह मासिक पाच लाखांवर नेली जाईल, असे सुल्तानिया यांनी स्पष्ट केले.
कंपनीच्या एकूण महसुलात होम शॉपिंगचे ७० टक्के योगदान तर डिस्काऊंट ऑनलाइन वाहिनीतून उर्वरित २५ टक्के महसूल येतो. या अत्यंत परिपक्व आणि विकसित बाजारपेठेतील अल्पावधीत नफाक्षम बनलेला ऑनलाइन विक्री उपक्रम म्हणून आज तेथे वैभव ग्लोबलकडे पाहिले जात असल्याचे सुल्तानिया यांनी स्पष्ट केले.
‘बीएसई’वर ५१० रुपयांच्या (गुरुवारचा बंद भाव) आसपास ‘वैभव ग्लोबल’च्या समभागाचे मूल्य आहे. सरलेल्या २०१४-१५ आर्थिक वर्षांत १,३७६ कोटींच्या उलाढालीवर तिने १०३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. सरलेल्या आर्थिक वर्षांचा अपवाद करता आधीची चार वर्षे कंपनीची उलाढाल वार्षिक सरासरी ३० टक्के दराने वाढत आली आहे.
भारताची ई-पेठ अभावग्रस्त!
कितीही गाजावाजा सुरू असला तरी अमेरिकेच्या तुलनेत अद्याप जेमतेम १ टक्का ई-पेठ भारतात विकसित होऊ शकली आहे. संगणकक्षम लोकसंख्या तुलनेने मोठी असली तरी खूपच मर्यादित बॅण्डविड्थ आणि ब्रॉडबॅण्ड सेवेमुळे अलीकडे अनेक ई-पेठांकडून आयोजित विक्री-उत्सवांचा वेबस्थळावरील झुंबडीमुळे बोजवारा उडाला आहे. त्यावर शक्कल म्हणून ‘अ‍ॅप्स ओन्ली’ पर्याय सध्या राबविला जात असला, तर मोबाइलधारकांचा डेटा वापर आणि त्यांना उपलब्ध डेटा स्पीडबद्दलही प्रश्नचिन्ह आहेत. ही सारी व्यवधाने असताना, पायाभूत रचनेचा मोठा अभाव असलेल्या भारताच्या ई-पेठेतील भाऊगर्दीचा हिस्सा बनणे अव्यवहार्य व खर्चीक ठरेल, असे सुल्तानिया यांनी नमूद केले. त्यापेक्षा कोरिया, जपान अथवा जर्मनीत येत्या तीन-चार प्रवेशांच्या योजना असल्याचे त्यांनी सांगितले.