विद्यमान आर्थिक वर्षांत जनसामान्यांकडे गुंतवायला पैसा आहे आणि सुयोग्य पर्याय मिळाल्यास त्याला भरभरून प्रतिसादही मिळतो, याचा प्रत्यय विद्यमान आर्थिक वर्षांत विविध कंपन्यांनी अपरिवर्तनीय रोख्यांच्या (नॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचर्स- एनसीडी) विक्रीतून उभारलेल्या ३४,४९६ कोटी रुपयांतून पुरेपूर मिळतो. बँकांतील ठेवी अथवा बचत खात्यात पैसा पडून ठेवण्यापेक्षा उद्योगक्षेत्रासाठी भांडवली योगदान देण्यात धन्यता मानणारे हे जनमानसांतील संक्रमण आशादायीच म्हणता येईल. उल्लेखनीय म्हणजे हा निधी उभारण्यात बहुतांश इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन, नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया, रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन, हुडको, नॅशनल हाऊसिंग बँक अशा देशाच्या पायाभूत विकासात कार्यरत सार्वजनिक उपक्रम आघाडीवर असून, लोकांनी देशाच्या विकासाला दिलेले व्यक्तिगत आर्थिक योगदानच ठरले आहे. ‘सेबी’कडे उपलब्ध माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०१३-१४ मध्ये विविध १७ कंपन्यांनी एकूण १२,६७५ कोटी रुपये एनसीडी रोखेविक्रीतून उभारण्याचे उद्दिष्ट ठरविले होते, प्रत्यक्षात या माध्यमातून त्यांना अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळून ३४,४९६ कोटी उभे राहिले. आधीच्या २०१२-१३ आर्थिक वर्षांत असा मार्ग अनुसरणाऱ्या १५ कंपन्या होत्या आणि त्यांनी त्यातून १६,९८२ कोटी उभारले होते. विद्यमान आर्थिक वर्षांच्या सांगतेला अजून पंधरवडा शिल्लक असून, आणखी तीन कंपन्यांचे (आयआयएफएचएल, मन्नपूरम आणि मुथ्थूत) प्रत्येकी २०० कोटी रुपयांची रोखेविक्री सध्या सुरू आहे. या रोखेविक्रीही यशस्वी झाल्यास, चालू वर्षांतील रोखेविक्रीतून उभारल्या गेलेल्या निधीचे प्रमाण ३५ हजार कोटींपल्याड जाईल. या आधी २०११-१२ मध्ये रोखेविक्रीच्या माध्यमातून कंपन्यांनी विक्रमी ३५,६११ कोटी रुपयांचा (अपेक्षित उद्दिष्ट ३१,१०० कोटी रु.) उभारला आहे.

‘एनसीडी’ काय आहेत?
अपरिवर्तनीय कर्जरोखे ज्यांना नॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचर्स अर्थात एनसीडी असे संबोधले जाते, ही एक प्रकारची कंपन्यांकडून वितरित करण्यात आलेली ऋणबंध आहेत, जी त्यांच्या व्यवसायासाठी आवश्यक खेळत्या भांडवलाची गरज पूर्ण करतात. नावाप्रमाणे हे अपरिवर्तनीय रोखे असल्याने त्यांचे समभागात रूपांतरण होत नाही. परंतु याच कारणामुळे या गुंतवणुकीवर परतावा म्हणून दिला जाणारा व्याजाचा दर आकर्षक असा साधारण १२ टक्क्यांच्या घरात व अधिक असतो. प्राप्तिकर कायद्यानुसार करवजावटीसाठी पात्र असलेली ही गुंतवणूक किमान तीन वर्षांसाठी कुलूपबंद असते. परंतु विक्रीपश्चात हे रोखे कंपन्यांच्या समभागांप्रमाणेच शेअर बाजारात सूचिबद्ध होत असल्याने, ते सहज रोकडसुलभही आहेत.

प्रमुख रोखेविक्री आणि त्यांना मिळालेला प्रतिसाद (२०१३-१४)
*  इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन    
अपेक्षित ” १५०० कोटी
उभारले  ” ४,०८३ कोटी
*  पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन
अपेक्षित ” ७५० कोटी
उभारले  ” ३,८७६ कोटी
*  नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया
अपेक्षित ” १,००० कोटी
उभारले  ” ३,६९८ कोटी
*  रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन    
   अपेक्षित ” १,००० कोटी
   उभारले  ” ३,४४१ कोटी