आलिशान बंगल्यात पाहिल्याचा दावा; भारतीय दूतावासाच्या संपर्कात यंत्रणा
१५ हून अधिक सार्वजनिक बँकांचे ९,००० कोटी रुपयांचे कर्ज थकविणारे व भारतातून पसार झालेले किंगफिशर एअरलाईन्सचे विजय मल्या हे लंडनमध्येच असल्याच्या शक्यतेला बळकटी मिळाली आहे.
लंडन शहराच्या उत्तरेत तासाभराच्या अंतरावर मल्या यांचा ३० एकर जागेवर आलिशान बंगला आहे. तिवेन नामक गावातील या बंगल्यात आठवडय़ाभरापूर्वी त्यांना पाहिले गेल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे. तिवेनमधील मल्या यांचे हे घर त्यांच्याकडे असलेल्या अन्य मालमत्तांपेक्षा बरेच मोठे आहे. त्यांचे कॅलिफोर्नियातही घर आहे.
६० वर्षीय मल्या यांच्याविरोधातील भारतातील तपास यंत्रणांची कारवाई तीव्र झाली आहे.
राज्यसभेचे सदस्य असलेल्या मल्ल्या यांचा ई-मेल तपासून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे नमूद करण्यात आले आहे. येथील भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांबरोबरही याबाबत विचारणा करण्यात येत आहे.
यूनाटेड स्पिरिट्स विकलेल्या ब्रिटनच्या दिआज्जिओबरोबरचा व्यवहार पूर्ण होताच आपण लंडनमध्ये निवृत्तीचे आयुष्य व्यतीत करणार असल्याचे मल्या यांनी भारत सोडण्यापूर्वी स्पष्ट केले होते. त्याप्रमाणे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवडय़ात हा व्यवहार होऊन मार्चच्या पहिल्या आठवडय़ात मल्या लंडनमध्ये आल्याचे कळते.

परराष्ट्र खात्याकडून कारवाई नाही
भारताबाहेर गेलेले मल्या यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई आपल्या खात्यांतर्गत करण्यात आली नसल्याचे परराष्ट्र खात्याने स्पष्ट केले आहे. विभागाच्या प्रवक्तयाने सांगितले की, मल्यांविरुद्ध खात्याकडून कोणतीही कारवाई अद्याप करण्यात आलेली नाही. तर निर्ढावलेल्या कर्जबुडव्यांविरोधातील कारवाई करताना कायद्याचा पूर्ण उपयोग केला जाईल, असे अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी म्हटले आहे.

कारवाई विलंबास सुट्टय़ा जबाबदार!
किंगफिशर एअरलाईन्स कर्ज बुडित प्रकरणात हात पोळलेल्या स्टेट बँकेने कंपनीविरुद्ध कार्यवाही करण्यास लागलेल्या दिरंगाईला सुट्टय़ांनी जबाबदार धरले आहे. कंपनीविरुद्ध न्यायालयात धाव घेण्यासाठी आणि त्याबाबतची प्रक्रिया पार पाडण्यासाठी लागून आलेल्या सुट्टय़ा कारणीभूत असल्याचे बँकेने म्हटले आहे. दिआज्जिओबरोबरचा मल्ल्या यांचा व्यवहार २६ फेब्रुवारीला झाल्यानंतर शनिवार व रविवार लागून आलेल्या सुटीमुळे मल्याविरुद्ध पावले उचलता आली नाहीत, असे बँकेने म्हटले आहे.

संसदीय समितीद्वारे चौकशीची मागणी
बँकांमार्फत किंगफिशर एअरलाईन्सला दिले गेलेल्या कोटय़वधी रुपयांच्या कर्ज प्रकरणाची संसदीय समितीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी बँक कर्मचारी संघटनेने केली आहे. ‘एआयबीईए’चे सरचिटणीस सी. एच. व्यंकटचलम यांनी ही मागणी केली आहे. सार्वजनिक बँकांमार्फत कंपनीला दिली गेलेली कर्ज प्रक्रिया कशी राबविली गेली तसेच या प्रकरणात रिझव्‍‌र्ह बँकेची काय भूमिका राहिली, हे स्पष्ट झाले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. यामुळे कर्ज देणाऱ्या तत्कालीन बँक अधिकाऱ्यांकडे संशयाची सुई फिरली आहे.

आयडीबीआय बँकेच्या तत्कालीन अध्यक्षांना समन्स
किंगफिशरकडून येणी असलेल्या ९०० कोटी रुपयांच्या कर्ज प्रकरणात सक्तवसुली संचलनालयाने सार्वजनिक क्षेत्रातील आयडीबीआय बँकेला समन्स बजाविले आहे. बँकेचे तत्कालिन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक योगेश अगरवाल यांच्यासह कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी ए. रघुनाथन यांना समन्स बजाविले आहेत. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या संचालकांनी मुंबईत बँकांनी कंपनीविरुद्ध तक्रार केली नसल्याची खंत व्यक्त केली होती.