जागतिक बॅंकेला ट्रम्प यांचे मत अमान्य

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘टॅरिफ  किंग’ या शब्दांत भारताची संभावना केली असली तरी, जागतिक बॅंक त्याच्याशी सहमत नाही. काही दशकांपूर्वीच्या तुलनेत भारतीय आयात-निर्यात करप्रणाली आणि अर्थव्यवस्था कितीतरी उदार बनल्याचे मत बुधवारी जागतिक बॅंकेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने व्यक्त केले.

या महिन्याच्या आरंभी ट्रम्प यांनी भारताचे वर्णन ‘टॅरिफ  किंग’ या शब्दात केले होते. अमेरिकेच्या अनेक वस्तुंवर भारतात भरमसाठ कर आकारणी होत असल्याची टीका त्यांनी केली होती.

जागतिक बॅंकेच्या विकास अर्थव्यवस्था संचालक प्रभारी मुख्य अर्थशास्त्रज्ञ शांता देवराजन यांना ट्रम्प यांच्या विधानाबाबत विचारले असता ते म्हणाले की, आमच्या आकडेवारीवरून तरी तसे नक्कीच म्हणता येणार नाही. भारतात काही कर आहेत, पण त्याला ‘टॅरिफ  किंग’ असे कोणत्याही दृष्टीने म्हणता येणार नाही. दक्षिण आशियापुरता विचार केला तरी भारतात सर्वाधिक करआकारणी होत नाही.