नवी दिल्ली : करोनाची दुसरी लाट भारताच्या अर्थवाढीसाठी जोखमीची असेल तसेच साथप्रसार रोखणारे निर्बंध देशाच्या अर्थविकासाला खीळ घालणारे असतील, अशी भीती व्यक्त करीतच, अमेरिकी पतमानांकन संस्था ‘मूडीज’ने २०२१-२२ आर्थिक वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था दुहेरी अंकातील विकास दर नोंदवले, असा आशावादही कायम ठेवला आहे.

आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये भारताचा विकास दर १३.७ टक्के असेल, असे ‘मूडीज’ने म्हटले आहे. मार्च २०२१ ला समाप्त वित्त वर्षांत देशाचा उणे (-) ८ टक्के अर्थप्रवास राहिला आहे.

भारतातील दुसऱ्या करोना  लाटेवर नियंत्रण म्हणून देशव्यापी टाळेबंदी लागू करण्याऐवजी केवळ बाधित क्षेत्रांवर सूक्ष्म रूपात लक्ष दिले जायला हवे. करोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण भारतात तुलनेत कमी असल्याचे निरीक्षण नोंदवत ‘मूडीज’ने याचे श्रेय लोकसंख्येतील मोठय़ा प्रमाणातील तरुणांच्या प्रमाणाला दिले आहे. भारतात अधिकाधिक लोकसंख्या लसीकरणाच्या कक्षेत यायला हवी, अशी गरजही तिने प्रतिपादली आहे.