चौथ्या तिमाहीची अर्थप्रगती आज स्पष्ट होणार

नवी दिल्ली : सरलेल्या २०१८-१९ आर्थिक  वर्षांच्या शेवटच्या तिमाहीतील देशाचा आर्थिक विकास दर ७ टक्क्यांना  स्पर्श करण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याबाबतचे प्रत्यक्ष चित्र केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाद्वारे शुक्रवारी सायंकाळपर्यंत स्पष्ट होणे अपेक्षित आहे.

उद्योगजगताची देशव्यापी संघटना ‘फिक्की’ने जानेवारी ते मार्च २०१९ तिमाहीदरम्यान भारताच्या अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर ६.५ ते ७ टक्के दरम्यान राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. २०२०-२१ मध्ये हा दर ७ टक्क्यांच्या पुढे, ७.२ टक्के असेल, असेही तिने नमूद केले आहे.

विद्यमान २०१९-२० या आर्थिक वर्षांत देशाचा विकास दर किमान ६.८ ते कमाल ७.३ टक्के असेल, असा अंदाज आलेखही व्यक्त करण्यात आला आहे.

देशातील कृषी क्षेत्राच्या वाढीचा दर चालू आर्थिक वर्षांत ३ टक्के असेल, तर उद्योग व सेवा क्षेत्र अनुक्रमे ६.९ व ८ टक्के दराने प्रगती करतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचबरोबर चालू आर्थिक वर्षांत औद्योगिक उत्पादन दर किमान ३.३ ते कमाल ५.५ टक्के असेल, असेही फिक्कीने म्हटले आहे.

या औद्योगिक संघटनेने महागाईबाबत घाऊक किंमत निर्देशांक २०१९-२० मध्ये २.१ ते ४ टक्के दरम्यान असेल, असेही स्पष्ट केले आहे.

व्याजदरात पाव टक्का कपात शक्य – डीबीएस

रिझव्‍‌र्ह बँकेच्या येत्या आठवडय़ात जाहीर होणाऱ्या पतधोरणात पाव टक्का रेपो दर कपात होईल, असा विश्वास सिंगापूरस्थित डीबीएस या वित्त-बँक समूहाने व्यक्त केला आहे. चालू एकूण वित्त वर्षांत एकूण पाऊण टक्क्यापर्यंत दरकपात होईल, असेही डीबीएसने म्हटले आहे. रिझव्‍‌र्ह बँकेचे दुसरे द्विमासिक पतधोरण येत्या ६ जून रोजी जाहीर होणार आहे.