मे महिन्यातील देशाची एकूण निर्यात १.१ टक्क्यांनी २४२.५ कोटी डॉलर झाली असली तरी याच काळात देशातील वस्त्रोद्योगाची त्यातही वस्त्र-प्रावरणांची निर्यात कामगिरी चांगलीच बहरली आहे. विशेषत: आर्थिक अस्थिरतेने ग्रस्त अमेरिका आणि युरोपीय महासंघ या पारंपरिक बाजारपेठेला वगळून, दक्षिण अमेरिका, आफ्रिकेसारख्या अपारंपरिक बाजारपेठांवर दिला गेलेला भर कामी आल्याचे उद्योगक्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.
घटती निर्यात आणि सोने-चांदीच्या रूपाने वाढती आयात यामुळे सरलेल्या एप्रिल-मे महिन्यात परराष्ट्र व्यापारातील तूट वाढत जाऊन तिने चिंताजनक रूप धारण केल्याचे सोमवारी जाहीर झालेल्या ताज्या आकडय़ांमधून स्पष्ट झाले. तथापि एप्रिल-मे महिन्यात तयार वस्त्रांची भारतातील निर्यात आधीच्या वर्षांतील याच कालावधीच्या तुलनेत ११ टक्क्यांनी वधारून २०० कोटी डॉलरवरून २३० कोटी डॉलरवर पोहोचली आहे, असे अॅपेक्सिलचे माजी अध्यक्ष आणि क्लोदिंग मॅन्युफॅक्चर्स ऑफ इंडिया (सीएमएआय) या ब्रॅण्डेड तयार वस्त्र-निर्मात्यांच्या शिखर संघटनेचे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष प्रेमल उदानी यांनी माहिती दिली.
भारताशी स्पर्धा करणाऱ्या चीन, व्हिएतनाम, कंबोडिया, बांगलादेश या अन्य वस्त्रनिर्मात्या देशांच्या तुलनेत वस्त्रनिर्मितीत एम्ब्रॉयडरी, कशिदाकारी, पिंट्रिंग, डाइंग ही मूल्यवर्धित भर भारताला स्पर्धात्मक अग्रक्रम मिळवून देणारी आहे. शिवाय चीनकडून टप्प्याटप्प्याने मजूरप्रवण गारमेंट उद्योगातून अंग काढले जाणे या बाबी भारताच्या पथ्यावर पडल्या असल्याचे उदानी यांनी सांगितले. त्यामुळे चालू वर्षांत निश्चित केलेले १७०० कोटी डॉलर निर्यातीचे लक्ष्यही हे उद्योगक्षेत्र गाठू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भारतातील तयार वस्त्रनिर्मिती उद्योग निश्चितच एका निर्णायक वळणावर पोहोचला असून, देशांतर्गत झपाटय़ाने बदलती जीवनशैली, पसंतीक्रम, माध्यमांचा वाढता प्रभाव या परिणामी तयार वस्त्रांच्या मागणीत सध्या वार्षिक १२ ते १५ टक्क्यांची वाढ दिसून येत असल्याचे, सीएमएआयचे अध्यक्ष राहुल मेहता यांनी सांगितले. या गतीने वाढ कायम राहिल्यास पाच वर्षांत या उद्योगाची देशांतर्गत उलाढाल ही सध्याच्या साधारण २ लाख कोटींवरून दुपटीने वाढून चार लाख कोटी रुपयांवर जाईल, असा विश्वासही त्यांनी ठामपणे व्यक्त केला. केंद्र सरकारने तयार वस्त्रांवरील अबकारी शुल्क काढून घेण्याचे टाकलेल्या पावलाने साधलेली ही किमया असल्याचे त्यांनी सांगितले. यंदाचा पाऊस सध्याच्या प्रारंभिक अंदाजाप्रमाणे चांगला राहिल्यास, कच्च्या मालाच्या किमतीत स्थिरता येऊन, निर्यातीला आणखीच बळ प्राप्त होईल, असा उदानी यांनी कयास व्यक्त केला.
तयार वस्त्रउद्योगाचा महामेळा!
आपले सुवर्ण जयंती वर्ष साजरे करीत असलेल्या क्लोदिंग मॅन्युफॅक्चर्स ऑफ इंडिया- सीएमएआयने देशातील वस्त्र-व्यापाराच्या महामेळ्याचे अर्थात ‘५७ व्या राष्ट्रीय वस्त्र मेळाव्या’चे आयोजन येत्या १ जुलै ते ३ जुलै दरम्यान गोरेगाव (पूर्व) येथील मुंबई प्रदर्शन संकुलात केले आहे. विविध तीन दालनांमध्ये पुरुष, स्त्री आणि बच्चे कंपनीच्या तयार वस्त्र-प्रावरणांचे एकूण ५८९ स्टॉल्सद्वारे या प्रदर्शनात तयार वस्त्रांचे ६४० ब्रॅण्ड्स या प्रदर्शनानिमित्ताने एकत्र पाहायला मिळतील. देशभरातील अंदाजे ३५००० किरकोळ विक्रेत्यांनी या प्रदर्शनाला भेट देणे अपेक्षित आहे, असे राहुल मेहता यांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 19, 2013 12:11 pm