मुंबई : भांडवली बाजारातील सध्याच्या अस्थिरतेत, बिनीच्या कंपन्यांच्या तुलनेत मध्यम आणि तळच्या श्रेणीतील कंपन्यांच्या समभागांच्या मूल्याला जबर हानी पोहोचली आहे. तरी दशकभरात भारतीय अर्थव्यवस्थेने आजच्या तुलनेत दुपटीने आवाका गाठला जायचा झाल्यास, ती लघू आणि मध्यम क्षेत्रातील कंपन्यांसाठी मोठी सुसंधी असेल.

जगातील सर्वाधिक वेगाने विस्तार साधत असलेल्या भारताच्या अर्थव्यवस्थेत, मिड कॅप कंपन्यांचा वाढीचा दर सापेक्ष तुलनेत जास्तच राहणे स्वाभाविक आहे. भारताचे जनसांख्यिकीय वैशिष्टय़, दरडोई उत्पन्नाच्या मात्रेत होत असलेला सुधार आणि त्या परिणामी दरडोई उपभोगातील वाढ हे सर्व घटक मिड कॅप कंपन्यांच्या बहुपेढी वाढ आणि विस्ताराकडे संकेत करणारे आहेत, असे महिंद्र अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक आशुतोष बिश्नोई यांनी स्पष्ट केले.

म्युच्युअल फंड व्यवसायात नव्याने पदार्पण करणाऱ्या या फंड घराण्याने सरलेल्या जानेवारीमध्ये प्रामुख्याने मिड कॅप समभागांमध्ये (किमान ६५ टक्के) गुंतवणूक करणारी महिंद्र उन्नती इमर्जिग बिझनेस योजना आणली. ही योजना खुली झाल्यापासून भांडवली बाजारात मिड कॅप कंपन्यांचे समभाग सपाटून मार खात असल्याचे दिसून येत आहे.

महिंद्र उन्नती इमर्जिग बिझनेस योजनेचा संदर्भ निर्देशांक एस अ‍ॅण्ड पी बीएसई मिड कॅप निर्देशांकांचा गत तीन महिन्यांतील परतावा कामगिरी उणे -४.५६ टक्के अशी आहे. तथापि ऐतिहासिकदृष्टय़ा पाहिल्यास, अनेक मिड कॅप समभागांचा दीर्घावधीतील परतावा कैक पटींचा राहिला आहे.

तर ११ मे २०१८ पर्यंत बीएसई मिड कॅप निर्देशांकाचा गत १५ वर्षांतील परतावा २१.१४ टक्के असा दमदार आहे.

जून २०१६ मध्ये म्युच्युअल फंड उद्योगात प्रवेश करणाऱ्या महिंद्र एएमसीचा सर्वाधिक भर हा ग्रामीण आणि निम-शहरी ग्राहकांवर राहिला असून, या बाजारवर्गासाठी गुंतवणुकीचा सर्वाधिक पसंतीचा पर्याय बनता येईल, अशा योजना आणण्याकडे आपला कल असेल, असे बिश्नोई यांनी स्पष्ट केले.

युनियन एएमसीमध्ये दायइची लाइफची  भांडवली भागीदारी

मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील युनियन बँक ऑफ इंडियाद्वारे पुरस्कृत युनियन अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनीमध्ये जपानच्या दायइची लाइफने ३९.६२ टक्के भागभांडवली मालकी मिळविली आहे. युनियन बँकेने २०११ साली युनियन एएमसीद्वारे म्युच्युअल फंड व्यवसायात प्रवेश केला. एप्रिल २०१८ अखेर ४,१६३ कोटी रुपयांची गंगाजळी असलेली ही म्युच्युअल फंड कंपनी आता युनियन बँक आणि दायइची लाइफ यांच्याकडून संयुक्तपणे पुरस्कृत केली जाईल. हिस्सा हस्तांतरणामागील आर्थिक व्यवहाराचा उभयतांकडून मात्र खुलासा करण्यात आलेला नाही. युनियन बँकेचे आयुर्विमा व्यवसायात दायइची लाइफशी पूर्वीपासून सख्य सुरू आहे.