टाटा समूहातील आदरातिथ्य व्यवसायातील कंपनी इंडियन हॉटेल्स लिमिटेडच्या संचालक मंडळाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत अध्यक्ष म्हणून सायरस मिस्त्री यांची पाठराखण करण्यात आली आहे. टाटा समूहाचे मुख्यालय बॉम्बे हाऊसमधील या नियोजित बैठकीसाठी अध्यक्ष या नात्याने मिस्त्री जात असताना तेथे उपस्थित माध्यमांचे प्रतिनिधी व छायाचित्रकारांना सुरक्षारक्षकांच्या मारहाणीला सामोरे जावे लागले.

टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून उचलबांगडीनंतर, या समूहातील कोणत्याही कंपनीने मिस्त्री यांच्या पाठीशी उभे राहण्याचा हा पहिलाच प्रसंग असून, हंगामी अध्यक्ष रतन टाटा यांची डोकेदुखी यातून वाढणार आहे. इंडियन हॉटेल्सच्या बरोबरीने, टाटा केमिकल्स, टाटा स्टील, टाटा मोटर्स, या प्रमुख कंपन्यांसह टाटा टेलिसव्‍‌र्हिसेसच्या अध्यक्षपदी सायरस मिस्त्री आहेत. या प्रत्येक कंपनीतील स्वतंत्र संचालकांचे मिस्त्री यांच्या नेतृत्वाबाबत पुढे येणारे अभिप्राय या संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण देणारे ठरेल.

इंडियन हॉटेल्सच्या संचालक मंडळाची ही बैठक कंपनीच्या दुसऱ्या तिमाहीतील वित्तीय कामगिरी विचारात घेण्यासाठी होती. त्या संबंधाने बैठकीपश्चात प्रसिद्ध केल्या गेलेल्या निवेदनात, कंपनीच्या स्वतंत्र संचालकांनी अध्यक्ष म्हणून सायरस मिस्त्री यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त केला असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ताज शृंखलेतील हॉटेलांची मालकी असलेल्या कंपनीने गतवर्षी याच तिमाहीत असलेला ११६.७९ कोटी रुपयांच्या तोटय़ाच्या तुलनेत यंदाच्या तिमाहीत तोटा ३८.३८ कोटी रुपयांवर मर्यादित राहिल्याचे सांगण्यात आले.