अमेरिकेच्या अध्यक्षपदी बराक ओबामा यांच्या फेरनिवडीचे उद्योगविश्वाने स्वागत केले आहे. ओबामांच्या विजयामुळे भारत-अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होतील, असा सूर उद्योगविश्वातून व्यक्त होत आहे. त्याचबरोबर आऊटसोर्सिगच्या विषयावर काही उद्योजकांनी चिंता व्यक्त केली.
भारतासाठी ही एक सकारात्मक घटना आहे. जगातील या दोन मोठय़ा अर्थव्यवस्थेमध्ये काही मुद्दे हे तणावाचे आहेत. आऊटसोर्सिग हा त्यामधील एक प्रमुख मुद्दा आहे. यावर लवकरच मार्ग काढण्यात येईल, असे गोदरेज समूहाचे संचालक आदि गोदरेज यांनी सांगितले.
भारती समूहाचे संचालक सुनील भारती मित्तल यांनीही गोदरेज यांच्या विधानाला दुजोरा दिला. भारतासाठी हा चांगला निकाल आहे. आऊटसोर्सिगच्या विषयावर मागील निवडणुकीत मोठी चर्चा झाली. बिल क्लिंटन हे याचे कडवे विरोधक होते. मात्र तरीही आपल्या आऊटसोर्सिग उद्योगावर याचे फारसे परिणाम झाले नाहीत असे मित्तल यांनी स्पष्ट केले.
ओबामांचा विजय ही अमेरिका आणि भारतामधील माहिती तंत्रज्ञान विश्वासाठी चांगली घटना आहे, असा विश्वास ‘एनआयआयटी’ चे संचालक राजेंद्र पवार यांनी व्यक्त केला,
ओबामा यांनी  बेरोजगारीच्या विषयाला अधिक प्राधान्य दिल्यामुळे याचा भारत -अमेरिका संबंधावर परिणाम होऊ शकतो, असा अंदाज ‘जेनपॅक्ट’चे माजी संचालक प्रमोद भसीन यांनी व्यक्त केला.