ब्रिटनने युरोपीय महासंघात राहावे की बाहेर पडावे यासाठी आजमावल्या जाणाऱ्या ‘ब्रेग्झिट’ सार्वमतात जर बाहेर पडण्याच्या बाजूने गुरुवारी कौल आल्यास, जागतिक वित्तीय बाजारपेठेला हादरे बसण्याचा संभव आहे. यातून भारतातही अस्थिरतेची स्थिती शक्य असून, तिचा सामना करण्यासाठी उपाययोजनांची सरकारने सज्जता करावी, अशी हाक उद्योगक्षेत्राने दिली आहे.
ब्रिटन युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याच्या बाजूने कौल आल्यास ताबडतोबीचा परिणाम म्हणून बरीच उलथापालथ घडू शकते. तथापि एक परिपक्व अर्थव्यवस्था या नात्याने आपली सर्व शक्यतांबाबत पुरेपूर तयारी असायला हवी, असे मत अ‍ॅसोचॅम या उद्योगसंघटनेने व्यक्त केले आहे. तथापि, रुपयाच्या विनिमय मूल्यावर यातून विपरीत परिणाम संभवणार नाहीत, यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्या प्रयत्नांबाबत आपल्याला पूर्ण खात्री असल्याची पुस्तीही अ‍ॅसोचॅमने जोडली आहे. ब्रिटनमध्ये बुधवारी हे महत्त्वाचे सार्वमत होत असून, त्याचा निकाल गुरुवारी (भारतीय प्रमाण वेळेनुसार सायंकाळी) येणे अपेक्षित आहे.
जागतिक वित्तसंस्थांचे लंडन हे एक प्रमुख केंद्र असल्याने, ब्रिटनमधील सार्वमताचे पारडे कोणत्या बाजूने झुकते ही बाब संबंध जगाला कवेत घेणारी ठरेल. विशेषत: जागतिक निधी व्यवस्थापकांचा गुंतवणुकीसाठी भारतासह उदयोन्मुख बाजारपेठांच्या दिशेने वळलेला होरा काही काळासाठी निश्चितच बाधित होईल. प्रचंड प्रमाणात गुंतलेला पैसा काढून घेतला जाईल. त्यातून नेमके कोणते परिणाम संभवतात, यावर नजर असायला हवी, असे संघटनेने म्हटले आहे.
रुपयाच्या विनिमय मूल्यावर ताण दिसत असल्यास रिझव्‍‌र्ह बँकेकडून वेळीच हस्तक्षेप केला जाईल आणि डॉलरचा पुरेसा पुरवठा राहील याकडे पाहिले जाईल, असा विश्वासही अ‍ॅसोचॅमने व्यक्त केला.

रुपयावर ताण अपरिहार्य!
ब्रेग्झिटच्या कौलातून साधली जाणारी अस्थिरता आणि तब्बल २० अब्ज डॉलरच्या (साधारण दीड लाख कोटी रुपये) विदेशी चलनातील बँकांतील ठेवींची (एफसीएनआर) वठणावळ दोन्ही एकाच वेळी आदळल्यास, त्याचा रुपयाच्या विनिमय मूल्यावर ताण येणे क्रमप्राप्त मानले जात आहे. खनिज तेलाच्या घसरलेल्या किमतीमुळे गेल्या १८ महिन्यांत सुधारलेली चालू खात्यावरील तुटीच्या स्थितीतही पुन्हा बिघाड होण्याचा संभव असल्याचा विश्लेषकांचा कयास आहे.