मेमधील किरकोळ महागाईने उसंत दिल्याचा तमाम अर्थव्यवस्थेचा आनंद फार काळ टिकू शकला नाही. सलग तीन महिने वधारलेला या कालावधीतील किरकोळ महागाई दर कमी झाल्याचे गेल्या आठवडाअखेर जाहीर झाल्यानंतर नव्या सप्ताहारंभीच याच महिन्यातील घाऊक महागाईने मात्र उचल खाल्ल्याचे स्पष्ट झाले. अत्यावश्यक अन्नधान्यांच्या किमती उंचावल्याने मेमधील घाऊक किंमत निर्देशांक ६.०१ टक्क्यांवर जाताना पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला.
घाऊक महागाई वधारल्याने कमी मान्सूनची धास्ती आणखी वाढली आहे. प्रत्यक्षात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यास महागाई अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. इराकमधील युद्धसदृश स्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर भडकले असतानाच आता देशांतर्गत घडामोडींचा परिणामही एकूणच अर्थव्यवस्थेवर होण्याची अटकळ आहे. महागाई केंद्रित करणारे व्याजदर निगडित रिझव्‍‌र्ह बँकेचे पतधोरण आता ऑगस्टमध्ये आहे.
भाज्या तसेच दुग्धजन्य पदार्थाच्या दरांनी उसंत खाल्ल्याने मेमधील किरकोळ महागाईचा दर ८.२८ टक्के असा तीन महिन्याच्या नीचांकावर स्थिरावला. सलग तीन महिने वधारल्यानंतर तो नरमला होता. तर सलग दोन महिने घसरल्यानंतर चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्याच, एप्रिल महिन्यात देशातील औद्योगिक उत्पादनाचा दर ३.४ टक्क्यांपर्यंत वधारल्याचेही गेल्या शुक्रवारी स्पष्ट झाले होते. आता मात्र अन्नधान्य महागाई ९.५० टक्क्यांपर्यंत गेल्याने मेमधील घाऊक किंमत निर्देशांकानेही ६ टक्क्यांपुढील प्रवास नोंदविला आहे.
मेमधील १० टक्क्यांनजीक जाऊ पाहणारा घाऊक महागाई दर हा डिसेंबर २०१३ मधील ६.४० टक्क्यांनंतरचा सर्वाधिक आहे. वर्षभरापूर्वी हा दर ४.५८ टक्के तर गेल्या एप्रिलमध्ये तो ५.२० टक्के होता. गेल्या महिन्यात उत्पादित वस्तूंच्या किमती ३.५५ टक्क्यांनी वाढल्या आहेत, तर अन्नधान्यांमध्ये सर्वाधिक किमती या बटाटे (३१.४४ टक्के), फळे (१९.४० टक्के) व तांदळाच्या (१२.७५ टक्के) वाढल्या आहेत.

आधीच किंमतवाढीचा घाला, त्यात कमजोर मान्सूनची भर
उद्योगजगताची चिंता
घाऊक महागाईतील ताजी वाढ चिंताजनकच आहे. औद्योगिक उत्पादनाने पुन्हा गती पकडून अर्थव्यवस्थेत उभारी दिसायची झाल्यास किंमतवाढीवर नियंत्रण अतीव महत्त्वाचे बनले आहे. कारण आटोक्याबाहेर गेल्याने व्याजाच्या दरात सतत वाढ होत आली आहे आणि उद्योगांसाठी भांडवलही महाग बनले आहे, ज्या परिणामी एकूणच अर्थव्यवस्थेची गती मंदावली आहे.
– चंद्रजीत बॅनर्जी, ‘सीआयआय’चे महासंचालक

सरासरी पेक्षा कमी पावसाबाबतचे अंदाज हे अन्नधान्याच्या किमती आणखी वाढविणारा दबाव पुढे जाऊन आणू शकेल. महागाई दरात वाढीची जोखीम ही प्रामुख्याने अन्नधान्य आणि इंधनचे दर या घटकांमुळेच संभवताना दिसते.
– सिद्धार्थ बिर्ला, ‘फिक्की’चे अध्यक्षम्

देशात कृषीमालाच्या लांबलेल्या पुरवठा साखळीतील अगणित अशी दलाल-अडत्यांच्या संख्येला आवर बसेल, शेतकऱ्यांचे थेट संघटित प्रक्रियादार, विक्रेते आणि निर्यातदारांशी संधान जुळेल, अशा सुधारणा अत्यावश्यक बनल्या आहेत. – डी. एस. रावत,  ‘अॅसोचॅम’चे महासंचालक