देशाचा वाढता विकास दर आणि भारतीयांची वाढती बचत याच्या जोरावर आयुर्विमा कंपन्यांची मालमत्ता २०२० पर्यंत एक लाख कोटी डॉलरचा टप्पा ओलांडेल, असा आशावाद व्यक्त करण्यात आला आहे. देशातील दुसरा पसंतीचा वित्तीय पर्याय म्हणून आयुर्विमाकडे भारतीयांचा कल दिवसेंदिवस वाढतच जाणार असून, या क्षेत्रातील रोजगारही येत्या सहा वर्षांत दुप्पट होईल, असेही चित्र रंगविण्यात आले आहे.
आयुर्विमा कंपन्यांमार्फत गुंतवणूकदारांकडून हप्तारूपी गोळा सध्या १९.४ लाख कोटी रुपये गंगाजळीचे व्यवस्थापन होते. येत्या सहा वर्षांत मात्र त्यात अडीच ते तीन पट वाढ होणार असल्याचे आयुर्विमा परिषदेचे महासचिव व्ही. मणिक्कम यांनी सांगितले. याचाच अर्थ २०२० पर्यंत आयुर्विमा मालमत्ता ६० लाख कोटी म्हणजेच अमेरिकी चलनात एक लाख कोटी डॉलरवर जाईल.
२०२० पर्यंत ६० कोटी रुपये होणाऱ्या आयुर्विमा मालमत्तेपैकी पायाभूत सेवा क्षेत्रातील गुंतवणूक सध्याच्या १.७३ लाख कोटी रुपयांवरून ३.५ लाख कोटी रुपये होईल. तर आयुर्विमा क्षेत्रात सध्या असलेला २.४१ लाख रोजगार २०२० पर्यंत दुप्पट, ५ लाख होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. या क्षेत्रात या कालावधीत १० अब्ज डॉलरची थेट विदेशी गुंतवणूक येण्याचा अंदाजही मलिकन यांनी वर्तविला.
मणिक्कम यांनी सांगितले की, आयुर्विमा उद्योगाचे व्याप्तीही सध्याच्या ३.२ टक्क्यांवरून २०२० पर्यंत ५ टक्क्यांपर्यंत जाईल. देशाच्या ग्रामीण भागात असलेले विम्याची व्याप्ती सध्याच्या स्तरावरून विलक्षण जाणार आहे. या तीन ते पाच वर्षांत या उद्योगाची वाढ वार्षिक १२ ते १५ टक्क्यांची असेल. २०१२-१३ मध्ये भारतीयांची बचत २३.१ टक्के नोंदली गेली होती. तीदेखील येत्या तीन वर्षांत ३० टक्क्यांपर्यंत जाईल, असेही मनिकम म्हणाले.
देशात तासाला पाच मृत्यू विमा दावे सोडविले जातात, अशी माहिती आयुर्विमा जागरूकता समितीचे अध्यक्ष राजेश सूद यांनी दिली. २०१२-१३ दरम्यान आयुर्विमाधारकांना १.९१ लाख कोटी रुपये मृत्यू दावा आदींसाठी वितरित झाले, असेही ते म्हणाले. आधीच्या आर्थिक वर्षांत ही रक्कम कमी, १.५३ लाख कोटी रुपये होती.
आयुर्विमा कंपन्यांमार्फत गुंतवणूकदारांकडून हप्तारूपी गोळा सध्या १९.४ लाख कोटी रुपये गंगाजळीचे व्यवस्थापन होते. येत्या सहा वर्षांत मात्र त्यात अडीच ते तीन पट वाढ होणार आहे. याचाच अर्थ २०२० पर्यंत आयुर्विमा मालमत्ता ६० लाख कोटी म्हणजेच अमेरिकी चलनात एक लाख कोटी डॉलरवर जाईल.
व्ही. मणिक्कम
आयुर्विमा परिषदेचे महासचिव
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 21, 2014 1:10 am