21 September 2020

News Flash

भारतीय विमा क्षेत्र पूर्वपदावर

जुलैमध्ये हप्ता संकलनात प्रथमच वाढ; करोना पार्श्वभूमीवर यंदा विम्याबाबत जागरूकता

संग्रहित छायाचित्र

जीवन विमा योजनांच्या प्रथम हप्ता संकलनात आर्थिक वर्षांतील पहिल्या तीन महिन्यात घट झाल्यानंतर जुलै महिन्यातील प्रथमच वाढ झाली आहे. टाळेबंदी लागू झाल्यावर अर्थव्यवस्था मूळ पदावर येत असताना विमा क्षेत्राने त्यात आघाडी घेतली असल्याचा निष्कर्ष आर्थिक संशोधन आणि रोखे पत निश्चिती कंपनी केअर रेटिंग्जने विमा क्षेत्राचा आढावा घेणाऱ्या अहवालात काढला आहे.

सर्वसाधारण विम्याच्या जुलैपर्यंतच्या हप्ता संकलनात मागील वर्षांच्या तुलनेत १.६ टक्के वाढ झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. तर सर्वसधारण जुलै २०१९ तुलनेत जुलै २०२० मध्ये सर्वाशारण विमा हप्ता संकलनात १३ टक्के वाढ झाली आहे. जीवन विम्याच्या पहिल्या हप्त्यांचे संकलन जुलै २०१९ मधील २१,५०९ कोटींच्या तुलनेत जुलै २०२० मध्ये ६.९ टक्कय़ांनी वाढून २२,९८६ कोटी झाले.

करोना पार्श्वभूमीवर यंदा विम्याबाबतची जागरुकता वाढल्याचे या आकडेवारीवरून दिसून येते, असे विश्लेषकांचे निरीक्षण आहे.

सरकारी मालकीच्या एलआयसीच्या तुलनेत खाजगी विमा कंपन्यांना या वृद्धीदराचा लाभ झाल्याचे या अहवालात नमूद केले आहे. खासगी विमा कंपन्यांनी जुलै २०१९ मधील ६,१९७ कोटींच्या तुलनेत जुलै २०२० मध्ये ७,८१५ कोटींचे पहिल्या विमा हप्त्याचे संकलन केले. सर्वसाधारण विमा व्यवसायात खाजगी आणि सरकारी कंपन्यांच्या वृद्धी दरांत मोठी तफावत नसल्याचे हा अहवाल सांगतो.  खासगी विमा कंपन्यांनी संकलित केलेल्या जीवन विम्याच्या पहिल्या हप्त्यात २६.१% वार्षिक वाढ झाली आहे. सर्वसधारण विमा व्यवसायातील आरोग्य विमा हप्ता संकलनात मागील वर्षांच्या तुलनेत तब्बल ४९ टक्कय़ांची वाढ झाली आहे. साधारण विमा व्यवसायात सर्वात मोठा हिस्सा वाहन आणि त्या खालोखाल आरोग्य विम्याचा आहे.

मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात टाळेबंदीमुळे विमा योजना विक्री रोडावल्याने मासिक विमा हप्ता संकलनात मोठी घट झाल्याचे पुढे आले आहे. चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या चार महिन्यात मागील वर्षांच्या पहिल्या चार महिन्यातील व्यवसायाच्या तुलनेत १२ टक्के घट झाली आहे. मागील वर्षी चार महिन्यात पहिल्या हप्त्याचे संकलन ८२,१४६ कोटी होते. तर या वर्षीच्या पहिल्या चार महिन्यातील पहिल्या विमा हप्त्याचे संकलन ७२,३२१ कोटी झाल्याचे विमा नियमन आणि विकास प्राधिकरणाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे. सरकारने प्राप्तिकराच्या कलम ८० सी खाली वजावट करण्यासाठी गुंतवणूक करण्यासाठीचा कालावधी वाढविल्याचा हा परिमाण असण्याची शक्यता या अहवालात वर्तविण्यात आली आहे.

केअर रेटिंग्ज-ट्रेसाटा करार  

कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित भविष्यातील वेगवेगळ्या उद्योगांतील व्यवसाय कल जाणून घेण्यासाठी केअर रेटिंगने जगातील अव्वल ट्रेसाटाबरोबर करार केला आहे. केअरला या करारामुळे ट्रेसाटाचे तंत्रज्ञान उपलब्ध होणार असून त्याचा वापर विश्लेषणात्मक कल जाणून घेण्यासाठी होणार असल्याचे केअरच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2020 12:16 am

Web Title: indian insurance sector presidency abn 97
Next Stories
1 रिझर्व्ह बँक ५७,१२८ कोटींचा सरप्लस केंद्र सरकारला देणार; बोर्डाची मंजुरी
2 राज्याकडून १७६ टक्के अधिक कर्ज उचल
3 महागाई दर जुलैमध्ये ६.९३ टक्क्य़ांवर
Just Now!
X