संपूर्ण युरोपला सध्या मंदीने ग्रासलेले आहे पण असे असले तरी माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील देशाची निर्यात आगामी आर्थिक वर्षांत १२ ते १४ टक्क्यांच्या आसपास असेल. जगभरातील वातावरण मंदीचे असले तरी प्रत्यक्षात देशांतर्गत वातावरण मात्र संगणकीकरणाच्या दिशेने जाणारे आहे. त्यामुळे आयटी उद्योगाला देशांतर्गत भरपूर वाव आहे, असे प्रतिपादन माहिती तंत्रज्ञान उद्योगाची शिखर संस्था असलेल्या ‘नासकॉम’चे अध्यक्ष आर. चंद्रशेखर यांनी मंगळवारी दिली.
माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील भविष्यवेध घेणाऱ्या अहवालाचे प्रकाशनही यावेळेस नासकॉमतर्फे पार पडले. त्यावेळेस आर. चंद्रशेखर म्हणाले की, युरोपातील वातावरण चिंताजनक आहे. आपली बहुतांश निर्यात ही युरोपीय देशांमध्येच होते. त्यामुळे त्याचा साहजिक परिणाम भारतीय उद्योगावर जाणवेल. मात्र असे असले तरी फारसे चिंता करण्याचे कारण नाही. कारण अलीकडेच नासकॉमने केलेल्या उद्योगाच्या सर्वेक्षणात असे लक्षात आले आहे की, देशांतर्गत बाजारपेठ मात्र सुस्थितीत आहे. त्याचा फायदा भारतीय आयटी कंपन्यांना निश्चितच होईल. भारतीय कंपन्यांची आयटी निर्यात विद्यमान आर्थिक वर्षांत १२.३ टक्क्यांनी वाढण्याच्या बेतात आहे. खरेतर ही निर्यात १३ ते १५ टक्क्यांनी वाढणेअपेक्षित होते.
नासकॉमचे उपाध्यक्ष बीव्हीआर मोहन रेड्डी म्हणाले की, युरोपीय समुदायातील देशांकडून निर्यातीचा ३५ते ४० टक्के महसूल येतो त्यामुळे युरोपीय मंदीचा परिणाम यंदा जाणवणे साहजिक आहे. यंदाच्या वर्षी आयटी उद्योगाचा महसूल १४६ दशकोटी अमेरिकन डॉलर्सचा असेल तर आगामी आर्थिक वर्षांत तो १६९ दशकोटी अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचणे अपेक्षित आहे.
दरम्यान, देशांतर्गत बाजारपेठ ही चांगली विस्तारत असून त्याचा फायदा भारतीय कंपन्यांना होतो आहे, असे सांगून रेड्डी म्हणाले की, देशभरात संस्था, आस्थापना आणि कंपन्या तसेच सरकारी पातळीवर संगणकीकरणाची मोहीम सुरू आहे. त्यामुळे या सर्वांचाच त्यावरील खर्च वाढला असून त्याचा फायदा उद्योगाला निश्चितच होतो आहे. त्यामुळे युरोपात मंदी असली तरी भारतातील संगणकीकरणामुळे त्याचा परिणाम तुलनेने कमी जाणवेल, अशी स्थिती आहे.

विद्यमान आर्थिक वर्षांत आयटी उद्योगामध्ये तब्बल २ लाख ३० हजार जणांना नव्याने रोजगार मिळाला असून आता या आयटी उद्योगात काम करणाऱ्या भारतीय कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांची संख्या ३५ लाखांच्या घरात पोहोचली आहे. भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनामध्ये गेल्या आर्थिक वर्षांत आयटी उद्योगाचा वाटा ८ टक्के होता. यंदाच्या आर्थिक वर्षांत देशाच्या जीडीपीमधील हा वाटा ९.५ टक्क्यांपर्यंत पोहोचेल.