चालू आर्थिक वर्षांत देशाचा विकास दर ७.३ टक्के प्रवास नोंदवेल, असा विश्वास अर्थमत्री जेटली यांच्याद्वारे व्यक्त होऊन दिवस उलटत नाही तोच ‘आशियाई विकास बँके’मार्फत भारताच्या विकास दराच्या अंदाज खुंटल्याने सेन्सेक्स, निफ्टीला मंगळवारी दणदणीत खाली आणले. सेन्सेक्सने तब्बल ५४१ अंश आपटी नोंदविली; तर निफ्टी निर्देशांक त्याच्या ७,९०० च्या अनोख्या टप्प्यापासून दुरावला.
मंगळवारच्या ५४१.१४ अंश घसरणीने सेन्सेक्स २५,६५१.८४ वर तर १६५.१० अंश आपटीने निफ्टी ७,८१२ वर आला. दोन्ही प्रमुख निर्देशांकात प्रत्येकी २.०७ टक्के घसरण नोंदली गेली. या मोठय़ा आपटीने सेन्सेक्स आता त्याच्या जवळपास पंधरवडय़ाच्या तळात आला आहे.
सरकारकडून राबविले जात नसलेल्या आर्थिक सुधारणा तसेच जागतिक कमी मागणी, देशांतर्गत कमी मान्सूनचे चित्र या जोरावर आशियाई विकास बँकेने भारताचा विकास दर खाली खेचला आहे. आंतरराष्ट्रीय बँकेच्या अंदाजानुसार, हा दर आता ७.४ असेल, असे अभिप्रेत करण्यात आले आहे. बँकेने यापूर्वीचा आपला अंदाज ७.८ टक्के जाहीर केला होता. विशेष म्हणजे, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सोमवारीच सिंगापूर दौऱ्यात ७.३ टक्के विकासाचा दिलासा विदेशी गुंतवणूकदारांना दिला होता.
सप्ताहारंभीच्या किरकोळ घसरणीनंतर मंगळवारचे मुंबई शेअर बाजाराचे व्यवहार तेजीसह सुरू झाले. आशियातील प्रमुख निर्देशांकांमध्ये नोंदली जात असलेली वाढ येथेही प्रत्यक्षात दिसून सेन्सेक्ससह निफ्टी उंचावले. शतकाहून अधिक अंशवाढीसह सेन्सेक्स २६,३०० च्या पुढे गेला होता. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने या वेळी ८,००० चा टप्पाही सर केला.
दुपापर्यंत निर्देशांकात किरकोळ चढ-उतार सुरू होते. मात्र दुपारनंतर फोक्सव्ॉगन घोटाळ्याच्या सावटाखाली घसरणीसह खुल्या झालेल्या युरोपी बाजारांचा कल पाहता स्थानिक निर्देशांकात एकदम घसरगुंडी रुंदावू लागली. सेन्सेक्स २६ हजारांच्याही खाली उतरला. पुढील दीड तास हा घसरणक्रम सुरू राहिला व अखेर निर्देशांक १० सप्टेंबरनंतरच्या खालच्या तळात विसावले.
सुरुवातीलाच ८,००० ला स्पर्श करणारा निफ्टी लगेच या टप्प्यापासून माघारी फिरत दुपापर्यंत ७,८२५ पर्यंत खाली येऊन ठेपला. व्यवहारात ७,७८७.७५ अंश तळ राखल्यानंतरही दिवसअखेर त्यात घसरणच कायम राहिली. परकी चलन मंचावर डॉलरच्या तुलनेत ६६ पर्यंत आपटी नोंदविणाऱ्या रुपयाचा प्रवासही गुंतवणूकदारांनी गंभीरतेने घेतला. युरोपातील ३ टक्केपर्यंतची निर्देशांक घसरणचिंताही येथील बाजाराने मंगळवारच्या व्यवहारात वाहिली. दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या महिन्यातील वायदापूर्तीच्या अखेरचा क्षणही बाजारात नफाखरेदीच्या रूपाने टिपला गेला.