News Flash

इंडियन ऑइलचे दोन लाख कोटींच्या गुंतवणुकीचे नियोजन

पुढील पाच ते सात वर्षांत हरित ऊर्जा पर्यायांवर २५,००० कोटी रुपये इंडियन ऑइल खर्च करणार आहे.

विद्युत वाहनांसाठी बॅटरी निर्मितीचीही योजना

मुंबई : खासगी क्षेत्राने प्रकल्प गुंतवणुकीकडे पाठ केली असताना,  आघाडीची सरकारी तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने आगामी पाच ते सात वर्षांत तब्बल २ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची आणि व्यवसाय विस्ताराची योजना आखली असल्याचे कंपनीचे अध्यक्ष संजीव सिंग यांनी बुधवारी येथे सांगितले.

मुंबईत झालेल्या भागधारकांच्या वार्षिक सभेनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना, सिंग यांनी हा गुंतवणुकीचे महानियोजन म्हणजे इंडियन ऑइलला देशातील सर्व घटकांच्या इंधनविषयक गरजांची पूर्तता करणारा उद्योगसमूह बनविण्याचा संकल्प असल्याचे सांगितले. जैव इंधनासारखे हरित पर्याय ही काळाने दिलेली हाक असून, त्या दिशेने पुढे येणाऱ्या प्रत्येक संधी हस्तगत करण्याकडे विशेषत्वाने ध्यान दिले जाईल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. कंपनीने सरलेल्या २०१८-१९ आर्थिक वर्षांत सुमारे २४,५०० कोटी रुपयांचा भांडवली खर्च वेगवेगळ्या प्रकल्पांवर केला आहे.

पुढील पाच ते सात वर्षांत हरित ऊर्जा पर्यायांवर २५,००० कोटी रुपये इंडियन ऑइल खर्च करणार आहे. २ जी आणि ३ जी इथेनॉल, जैव इंधन, कोल गॅसिफिकेशन, हायड्रोजन-सीएनजी, हायड्रोजन फ्युएल सेल्स आणि विद्युत वाहनांसाठी बॅटरी निर्मिती अशा नवीन व्यवसायांमध्ये कंपनीचा प्रवेश होऊ घातला आहे.

प्रस्थापित तेल शुद्धीकरण प्रकल्पांचे आधुनिकीकरण व विस्तार तसेच त्या अंतर्गत पेट्रोरसायने उत्पादनांचे एकात्मीकरण यावर आणखी २० ते ३० हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. शहरी वायू वितरण प्रकल्पांवर १० हजार कोटी खर्च केले जाणार आहेत.

स्थलांतरित ‘नाणार’ प्रकल्पासाठी रायगडची जागा अनुकूल

मुंबई : नाणारमधून रायगड जिल्ह्य़ात स्थलांतरित बहुचर्चित संयुक्त भागीदारीतील पेट्रोकेमिकल संकुलासाठी नवीन प्रस्तावित ठिकाण सर्वागाने अनुकूल असल्याचे इंडियन ऑइलचे अध्यक्ष संजीव सिंग यांनी सांगितले.

या प्रस्तावित प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादनाची प्रक्रिया राज्य सरकारकडून पूर्ण होणे अपेक्षित असून, कंपनीच्या आगामी विस्तार कार्यक्रमातील तसेच देशाच्या ऊर्जा स्वावलंबनाच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सिंग यांनी आवर्जून सांगितले.

इंडियन ऑइलसह, एचपीसीएल, बीपीसीएल या दोन सरकारी तेल कंपन्यांबरोबर, सौदी आराम्को व अ‍ॅडनॉक यांची भागीदारी असलेला हा प्रकल्प, तसेच नागपट्टिणम येथे नवीन रिफायनरी प्रकल्प तसेच पारादीप येथे एमईजी प्रकल्प असे पूर्णपणे नवीन प्रकल्प पुढील पाच ते सात वर्षांत मूर्त रूप धारण करू शकतील, असा विश्वास सिंग यांनी व्यक्त केला.

‘लिथियम आयन’ बॅटरीला देशी पर्याय..

*  बॅटरी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात इंडियन ऑइलकडून आक्रमक स्वरूपात संशोधन व विकास उपक्रम सुरू असून, त्यातून प्रत्यक्ष व्यापारी उत्पादनाला लवकरच सुरुवातही होईल, असे कंपनीचे अध्यक्ष संजीव सिंग यांनी स्पष्ट केले. सध्या विद्युत वाहनांसाठी वापरात येणाऱ्या लिथियम आयन बॅटरीला आयातपर्यायी व संपूर्णपणे देशांतर्गत स्रोतांवर आधारित नव्या प्रकारच्या बॅटरी विकसित करण्याच्या दृष्टीने एका तंत्रज्ञान कंपनीशी अंतिम स्वरूपावर बोलणी सुरू असल्याचे सिंग यांनी सांगितले. मात्र त्या बाबत अधिक विस्ताराने सांगण्यास त्यांनी नकार दर्शविला.

संजीव सिंग अध्यक्ष, इंडियन ऑइल

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2019 3:09 am

Web Title: indian oil plans to invest rs 2 lakh crore zws 70
Next Stories
1 कमकुवत मागणीवर उतारा ; हिंदुस्थान युनिलिव्हरकडून किमतीत ३० टक्के कपात
2 निर्देशांक उभारी अल्पायुषी
3 गुंतवणूकदार ४.८ लाख कोटींनी श्रीमंत
Just Now!
X