सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ओव्हरसीज बँकेने २०१२-१३ आर्थिक वर्षांच्या अंतिम तिमाहीत अवघ्या ५८.६० कोटी रुपयांच्या निव्वळ नफ्याची नोंद केली आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीतील ५२८.८८ कोटींच्या तुलनेत यंदा नफा एक-दशांश पटीने खाली येण्यामागे बुडीत कर्जासाठी कराव्या लागलेली वाढीव तरतूद हे कारण असल्याचे बँकेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक एम. नरेंद्र यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
जानेवारी ते मार्च २०१३ या तिमाहीत बँकेने बुडीत कर्जापोटी रु. ७७० कोटींची तरतूद करणे भाग पडले. बँकेच्या नफ्याला खिंडार पडण्याचे हे प्रमुख कारण असल्याचे नरेंद्र यांनी स्पष्ट केले. बँकेचा संपूर्ण वर्षांचा निव्वळ नफा हा रु. ५६७.२३ कोटी इतका आहे.
बँकेने २०१२-१३ आर्थिक वर्षांत १५.७ टक्के वाढीसह रु. २२,६४९.६३ कोटींचे एकूण उत्पन्न कमावले. तर निव्वळ व्याजापोटी उत्पन्न या काळात १५.५३ टक्क्यांनी वाढून रु. २०,६७६.७३ कोटींवर पोहचले आहे. बँकेचा ढोबळ नफा केवळ ८ टक्क्यांनी वाढून रु. ३,५३४.१५ कोटींवरून (गेल्या वर्षी) यंदा ३,८१७.०१ कोटींवर गेला आहे.
आजच्या घडीला वाढीचा दर महत्त्वाचा नसून, खरा प्रश्न हा चालू खाते-बचत खात्यात (कासा) दमदार वाढ, वितरित कर्जाची प्रभावी वसुली आणि अनुत्पादित/बुडीत कर्जाचा भार लवकरात हलका करणे हीच बँकेपुढील अग्रक्रमाची उद्दिष्टे बनली आहेत. तथापि चालू वर्षांत हा आधीच्या तुलनेत बँकेच्या व्यवसायात वाढीचा दर चांगला राहण्याची शक्यता आहे. तरी रिझव्‍‌र्ह बँक शुक्रवारच्या वार्षिक पतधोरणात कर्ज-वितरणाचे वाढीचे लक्ष्य किती ठेवते त्यानुसार म्हणजे सध्याच्या १५ टक्क्यांचा वृद्धीदर कायम राखण्याचा आपला प्रयत्न राहील.
’ एम. नरेंद्र,
अध्यक्ष, इंडियन ओव्हरसीज बँक