आव्हाने व संधींवर श्वेतपत्रिका काढणार!

जगातील तिसरी मोठी उलाढाल असलेल्या भारतीय औषधी उद्योगाने २०२० सालापर्यंत १५ टक्के वार्षिक दराने प्रगती साधणे अपेक्षित आहे. तथापि या उद्योगक्षेत्राच्या यापेक्षा अधिक चांगल्या वाढीच्या शक्यता व कामगिरीची अपेक्षा केली जाते. या पाश्र्वभूमीवर आघाडीच्या औषध कंपन्यांचे प्रमुख, या उद्योगक्षेत्रातील जागतिक स्तरावर उपलब्ध संधी आणि आव्हानांचा ऊहापोह आठवडाभर चालणाऱ्या ‘इंडिया फार्मा वीक’ या चर्चासत्र व प्रदर्शनादरम्यान करणार आहेत. १७ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबपर्यंत चालणारा हा उपक्रम म्हणजे यूबीएमद्वारे आयोजित ‘सीपीएचआय इंडिया’ची १०वी आवृत्ती आहे.

भारतीय औषधी उद्योगाला निर्यातीला चालना देण्यासाठी उपलब्ध पारंपरिक व अपारंपरिक मार्ग, या क्षेत्रातील ताबा व विलीनीकरणाचे परिमाण, बायोसिमिलर्स या सारखे नवे प्रवाह, गुणात्मकतेचे पालन त्याचप्रमाणे या क्षेत्रातील मेक इन इंडिया प्रयोग अशा विविध विषयांवर चर्चासत्राच्या दोन दिवसांत विचारमंथन होईल. तर सोमवार २१ नोव्हेंबरपासून दक्षिण आशियातून सव्त मोठे औषधी उद्योगाचे प्रदर्शन सीपीएचआय अ‍ॅण्ड पी -मेक इंडियाला सुरुवात होईल. जगभरातून १०० देशांचे प्रतिनिधित्व करणारे १,३०० हून अधिक कंपन्यांचा प्रदर्शनात सहभाग अपेक्षित आहे. इतक्या मोठय़ा संख्येने प्रदर्शकांना सामावून घेता यावे म्हणून गोरेगावच्या एनएसई संकुलासह, वांद्रे कुर्ला संकुलातील मैदान अशा दोन ठिकाणी विभागून हे प्रदर्शन भरविले जात आहे, असे यूबीएमचे व्यवस्थापकीय संचालक योगेश मुद्रास यांनी सांगितले.

आघाडीच्या २० औषधी कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बंद दरवाजाआड २२ नोव्हेंबरला दिवसभराचे मंथनही या निमित्ताने घडणार आहे. भारतीय औषध उद्योगाची सामथ्र्यस्थळे, त्यायोगे असणाऱ्या संधी, आव्हाने आणि अडसर याबाबत धोरणकर्त्यांना उद्बोधक ठरेल, अशी श्वेतपत्रिकाही काढली जाणार आहे, असे मुद्रास यांनी सांगितले.

आरोग्यनिगा क्षेत्रातील प्रावीण्याचा बीएमजेपुरस्कारांनी गौरव

मुंबई : आरोग्यनिगा क्षेत्रातील गुणवत्ता, वैद्यकीय शिक्षण, तंत्रज्ञानात्मक अभिनवता, संशोधन आणि निदानात्मक निपुणता या भारताच्या आरोग्य क्षेत्रात पडणाऱ्या पुढच्या पावलांमागील व्यक्ती व संस्थांच्या योगदानाचा गौरव ‘बीएमजे अ‍ॅवार्ड्स साऊथ एशिया २०१६’ या शनिवार, १९ नोव्हेंबरला नवी दिल्ली येथे आयोजित पुरस्कार सोहळ्यात केला जाणार आहे. संपूर्ण दक्षिण आशियातून या पुरस्कारासाठी प्रवेशिका आल्या असून, महाराष्ट्रातून त्यासाठी सर्वाधिक १३५ प्रवेशिका आल्या आहेत. सेठ जी एस मेडिकल कॉलेज व केईएम रुग्णालयातून नऊ, टाटा मेमोरियल रुग्णालय अणि भारतीय विद्यापीठ पुणे येथून प्रत्येकी सहा प्रवेशिका आल्या आहेत.