भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी कर्नाटकमधील डेक्कन अर्बन को-ऑप्रेटिव्ह बँक लिमिटेडवर निर्बंध घालण्याची घोषणा केली. यापुढे बँकेला कोणतेही कर्ज देता येणार नाही तसेच बँकेमध्ये नव्याने निधी जमा करता येणार नाही असं रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केलं आहे. तसेच ग्राहकांवरही निर्बंध लागू करण्यात आले असून खात्यामधून जास्तीत जास्त हजार रुपये काढता येणार असल्याचंही आरबीआयने म्हटलं आहे. या बँकेला पूर्व परवानगीशिवाय कोणतीही नवीन गुंतवणूक किंवा व्यवहार करण्यास बंदी घालण्यात आलीय.

बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना बुधवारी यासंदर्भातील निर्देश देण्यात आले आहेत. यासंदर्भातील एक पत्रही आरबीआयने जारी केलं आहे. बँकेची सध्याची आर्थिक स्थिती पाहता खातेदारांना बचत खात्यांमधून जास्तीत जास्त एक हजार रुपये काढता येणार आहे. त्यापेक्षा अधिक पैसे काढण्यास ग्राहकांना परवानगी देण्यात आलेली नाही.  आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार कर्ज फेडणाऱ्यांना जमा निधीच्या आधारावर कर्जफेड करता येणार आहे. यासाठी काही अटी आरबीआयने ठेवल्या आहेत.

आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार बँकेवर लादलेल्या निर्बंधांचा अर्थ बँकेचा परवाना रद्द केला आहे असं घेण्यात येऊ नये. बँकेची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर बँकेवर सध्या टाकण्यात आलेले निर्बंध उठवण्यात येतील असं आरबीआयने म्हटलं आहे. आरबीआयचे हे निर्देश १९ फेब्रुवारी २०१९ रोजी जारी करण्यात आले. हे निर्बंध सहा महिन्यांपर्यंत लागू राहणार असून या कालावधीमधील बँकेच्या कारभारावर पुढील निर्णय घेतला जाईल.