गेल्या चारही सत्रांत सतत घसरणाऱ्या रुपयाने मंगळवारी डॉलरच्या तुलनेत ६४ नजीकचा प्रवास नोंदविताना चांगलीच धास्ती निर्माण केली. दिवसअखेर भारतीय चलन कालच्या तुलनेत प्रति अमेरिकी डॉलर ४७ पैशांनी घसरत ६३.७१ पर्यंत खाली आले. परकी चलन व्यवहाराची सत्राची सुरुवात करताना रुपया ६३.३५ अशा किमान पातळीवरच होता. दिवसभरात तो ६३.८४ पर्यंत घसरला. असे करताना त्याने गेल्या दोन महिन्यांचा तळ गाठला. व्यवहारात चलन फक्त ६३.३० या उंचीपर्यंत पोहोचू शकले. पाचही सत्रांतील मिळून चलनाची कमकुवतता २०९ पैशांची राहिली आहे. तत्पूर्वी ५ नोव्हेंबर रोजी रुपया १२ पैशांनी भक्कम होत ६१.६२ या वरच्या स्तरावर होता. रुपया ६२ पर्यंत असतानाच दोन दिवसांत स्थिरावण्याचा दावा केंद्रीय अर्थसचिवांनी केला होता. अर्थतज्ज्ञांच्या मते, चलनाचा आगामी प्रवास ६२-६४ या दरम्यान काही काळ सुरू राहील.