मुंबई : मंगळवारच्या सत्रात डॉलरच्या तुलनेत ७० पर्यंतचा तळ अनुभवणारा रुपया अखेर गुरुवारी पुन्हा २६ पैशांच्या घसरणीसह ७०.१५ या सार्वकालिक नीचांक पातळीवर स्थिरावला. स्थानिक चलनाचा हा ऐतिहासिक घसरण स्तर आहे.

गुरुवारी परकीय चलन मंचावर प्रारंभीच्या व्यवहारातच रुपया डॉलरमागे ४३ पैशांनी गडगडून ७०.३२ च्या पातळीवर घरंगळलेले दिसले. दोन दिवसांपूर्वी मंगळवारच्या सत्रात रुपयाचे मूल्य तीव्र स्वरूपात उतरले होते. सत्रादरम्यान प्रति डॉलर ७० पल्याड रुपया तेव्हा पहिल्यांदाच अवनत झाला होता. मंगळवारअखेर त्यात काही सुधारणा होत, स्थानिक चलन तेव्हा सत्तरीच्या आत स्थिरावले होते. त्याचा त्यावेळचा बंदस्तर ६९.८९ होता.

परकी चलन मंचावर बुधवारी स्वातंत्र्य दिनानिमित्त व्यवहार झाले नव्हते. गुरुवारच्या व्यवहारात डॉलरसमोर ७०.२५ अशी किमान व्यवहार सुरुवात करणारा रुपया गुरुवारच्या व्यवहारात ७०.३२ पर्यंत घसरलेला दिसून आला.

तुर्कस्तानच्या अर्थव्यवस्थेच्या चिंतेने येथील परकी चलन मंचावर डॉलरची मागणी वाढल्याने, रुपयावर तीव्र घसरणीचे सावट निर्माण झाले आहे. सर्वच प्रमुख आंतरराष्ट्रीय चलनांच्या तुलनेत डॉलरची सशक्तता वाढली आहे. तुर्कस्तानमधील घडामोडीच्या पाश्र्वभूमीवर, जागतिक स्तरावर एकूण उभरत्या अर्थव्यवस्थांबाबत नकारात्मक भावना निर्माण झाली आहे. स्थानिक भांडवली बाजारातून विदेशी वित्तसंस्थांकडून समभागांची विक्री सुरू आहे. त्याचाही रुपयाच्या मूल्यावर अतिरिक्त ताण आला आहे. त्यातच बँका तसेच आयातदारांनी विदेशी चलनाची अधिक खरेदी सुरू केली आहे.

निर्यातदारांमध्ये उत्साह

घसरत्या रुपयामुळे निर्यातदारांमध्ये मात्र उत्साहाचे वातावरण आहे. काही क्षेत्रांना स्थानिक चलनाच्या विक्रमी अवमूल्यनाचा लाभ होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. ‘इंडियन सिल्क एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल’चे अध्यक्ष सतिश गुप्ता यांनी, भक्कम डॉलरमुळे विदेशातील व्यवहारांवर विसंबून असणाऱ्या निर्यातदारांना काही कालावधीसाठी लाभ घेता येईल असे म्हटले आहे.घसरत्या रुपयामुळे खरेदीदार आता निर्यातदारांकडून वस्तूंच्या किंमतीतील सूट अपेक्षितील, असा अंदाज ‘सीआयआय’चे महासंचालक चंद्रजीत बॅनर्जी यांनी व्यक्त केला. डॉलरच्या तुलनेतील रुपयाचा ६९ ते ७१ पर्यंतचा घसरणप्रवास भारतीय अर्थव्यवस्थेकरिता सहनशील असल्याचे मत असोचॅमचे सरचिटणीस डी. एस. रावत यांनी व्यक्त केले आहे.

चिंतेचे कारण नाही

रुपयाच्या वास्तविक मूल्याचे नीट मूल्यमापन झाले पाहिजे, हे वाजवीपेक्षा अधिक असूनही चालणार नाही. किंबहुना, रुपयाचे मूल्य मजबूत असणे हे अर्थव्यवस्थेच्या सुस्थितीचे लक्षण आहे, ही धारणा गैर आहे. गेल्या तीन वर्षांत रुपयाचे मूल्य १७ टक्क्यांनी वधारले, तर चालू वर्षांच्या सुरुवातीपासून ते ९.८ टक्क्यांनी गडगडले. एकंदरीत रुपयाचे मूल्य (२०१३-१४ च्या पातळीपासून) सुधारलेच आहे. आता रुपयाचे विनिमय मूल्य हे मागणी आणि पुरवठय़ामधील वास्तविक संतुलन योग्य रूपात प्रतिबिंबित करीत आहे. त्यामुळे ताजी घसरण हे चिंतेचे कारण असू नये.

 राजीव कुमार, निती आयोगाचे उपाध्यक्ष

(गुरुवारी नवी दिल्लीत ‘नाबार्ड’च्या कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना)

डॉलरच्या सशक्ततेचा हा परिणाम

सद्य घटनेकडे रुपयाच्या मूल्यातील कमजोरीपेक्षा डॉलरच्या सशक्ततेच्या दृष्टीने पाहिल्यास, रुपयाची सार्वकालिक नीचांकाला गटांगळी चिंताजनक वाटत नाही. माझ्या मते रुपयाचे वास्तविक मूल्य गेल्या काही वर्षांत वाढत आले आहे. या काळात अर्थव्यवस्थेत चलनवाढीचा दर सामान्य राहिला असला तरी तो जागतिक चलनवाढीच्या दराच्या तुलनेत थोडा अधिक आहे. परिणामी, रुपयाच्या विनिमय मूल्यात थोडा कमकुवतपणा आवश्यकच आहे. २०१३ सालातील संकटाच्या तुलनेत सध्या खूप चांगली स्थिती आहे.

’ रघुराम राजन, रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी गव्हर्नर

(गुरुवारी वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत)