भांडवली बाजारातही निर्देशांक घसरणीचा षटकार

मुंबई : अमेरिकी डॉलरपुढे शरणागती स्थानिक चलनाला बुधवारी ७२ नजीक घेऊन गेली. सलग सहाव्या सत्रात रोडावताना रुपयाने बुधवारी डॉलरमागे ७१.७५ हा नवीन तळ दाखविला. मंगळवारच्या तुलनेत त्यात आणखी १७ पैशांची घसरण दिसून आली. दर्म्यान रुपयाच्या तीव्र ऱ्हासाच्या चिंतेने भांडवली बाजारात सेन्सेक्स-निफ्टीने सलग सहाव्या सत्रात घसरण बुधवारी दाखविली.

आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमती प्रति पिंप ७८ डॉलरला पोहचला असून, डॉलर जवळपास सर्वच आशियाई चलनांसमोर भक्कम बनत चालला आहे. खनिज तेलदरात बुधवारी काहीसा उतार अनुभवला गेला, तरी रुपयाला घसरणीपासून उसंत मिळताना दिसली नाही.

परकीय चलन विनिमय मंचावर रुपयाने बुधवारच्या व्यवहाराची  सुरुवात करताना १८ पैशांनी वाढ दाखविली होती. मात्र ही सशक्तता अल्पजीवी ठरली आणि व्यवहारात रुपयाचे मूल्य प्रति डॉलर ७१.९७ या ऐतिहासिक नीचांकापर्यंत अल्पावधीतच घसरले. दिवसअखेर तो काहीसा सावरला असला तरी नवीन नीचांक गाठूनच चलन बाजारातील व्यवहार थंडावले.

गेल्या सलग सहा व्यवहारांतील घसरणीतून रुपयाचे मूल्य  १६५ पैशांनी रोडावले आहे.

घसरत्या रुपयाने रोख्यांवरील परतावा ८ टक्क्यांपुढे म्हणजे गेल्या चार वर्षांच्या वरच्या टप्प्यावर पोहोचले आहेत.

दरम्यान, डॉलरच्या तुलनेत आणखी घसरलेला रुपया आणि कमकुवत आशियाई बाजाराच्या पडछायेने सलग सहाव्या सत्रात सेन्सेक्स व निफ्टी निर्देशांकांना  खाली आणले. १३९.६१ अंश घसरणीसह सेन्सेक्स ३८,०१८.३१ वर तर निफ्टीही ४३.३५ अंश घसरणीने ११,४७६.९५ पातळीवर येऊन ठेपला आहे. आठवडय़ात जवळपास १,००० अंशांनी दुरावत सेन्सेक्स पंधरवडय़ाच्या तळात विसावला आहे.

गेल्या सहा व्यवहारात सेन्सेक्सने नोंदविलेली ८७८.३२ अंश घसरण ही सहा महिन्यातील सर्वात मोठी सलग घसरण-मालिका राहिली आहे. भांडवली बाजारावर अमेरिका-तुर्कस्तान, अर्जेटिना, चीन दरम्यानच्या व्यापार युद्धाचे सावट कायम होतेच. त्यात आता आंतरराष्ट्रीय स्तरावर भडकलेल्या खनिज तेलाच्या किमती आणि घसरत्या रुपयाच्या चिंतेची भर पडली आहे.

बुधवारची सुरुवात काहीशा तेजीने करताना सेन्सेक्स व्यवहारात ३८,२५०.६१ पर्यंत झेपावला होता. मात्र पुढे नफारूपी घसरणीमुळे त्याने लगेच ३८,००० चा टप्पाही सोडला. दरम्यान ३७,७७४.४२ हा सत्रतळ गाठल्यानंतर व्यवहाराचा शेवटही सेन्सेक्सने ३८,००० खालीच केला.

राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी या प्रमुख निर्देशांकाचा बुधवारचा प्रवास ११,४७६.९५ ते ११,३९३.८५ असा राहिला. दिवसअखेर अर्धशतकी घसरणीने निर्देशांकाला कसेबसे ११,४०० पुढील स्तर राखता आला.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये दूरसंचार सर्वाधिक २.२३ टक्क्यांनी घसरला. त्याचबरोबर ग्राहकोपयोगी वस्तू, भांडवली वस्तू, ऊर्जा, स्थावर मालमत्ता निर्देशांकही घसरले. मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप निर्देशांकही घसरले. त्यातील घसरण अनुक्रमे ०.६१ व ०.५२ टक्क्यांची राहिली.