रिझव्‍‌र्ह बँक आणि केंद्र सरकारच्या उपाययोजनांनंतरही भारतीय चलनातील घसरण थांबण्याचे नाव घेत नाही. विक्रमी घसरणीच्या सलग सहाव्या सत्रात गुरुवारच्या व्यवहारात रुपयाने ६५.५६चा नवीन तळ दाखविला. दिवसअखेर सावरूनही त्याने कालच्या तुलनेत डॉलरच्या मुकाबल्यात आणखी ४४ पैशांनी आपटी खात ६४.५५ असा आणखी एक नवीन नीचांक नोंदविला.
मेअखेरपासून सुरू झालेली भारतीय चलनातील घसरण ६५ पर्यंत येऊन ठेपली आहे. गेल्या पाच सत्रांत तर रुपयाने दररोज नवा नीचांक नोंदवला आहे. गुरुवारीही हेच चित्र कायम होते. सकाळच्या व्यवहारातच डॉलरच्या तुलनेत स्थानिक चलन ६५.१२ पर्यंत जाऊन भिडले.  कालच्या तुलनेत ही घसरण ८९ पैशांची होती. चलन कालदेखील याच प्रमाणात घसरून ६४.११ च्या नव्या नीचांकावर गेले होते. गुरुवारी ६५ च्या खाली राहताना रुपया दिवसभरात ६५.५६ या सर्वाधिक खालच्या पातळीवर गेला. तर दिवसअखेर ६४.५५ हा स्थिरावलेला त्याचा दर व्यवहारातील सर्वोच्च राहिला.
गेल्या आठवडय़ाभरात भारतीय चलन ६ टक्क्यांनी कमकुवत झाले आहे. या दरम्यान रुपया ६१ वरून थेट ६५ पर्यंत घसरला आहे, तर चालू वर्षांतील डॉलरच्या तुलनेत त्याची घसरण ही तब्बल १९ टक्क्यांची आहे. अमेरिकन फेडरल रिझव्‍‌र्हमार्फत रोखे खरेदी टप्प्याटप्प्याने कमी करण्याचे संकेत मिळाल्यानंतर २२ मेपासून रुपया सातत्याने घरंगळत आहे. या दरम्यान चलनाला सावरण्यासाठी भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेमार्फत वेळोवेळी उपाययोजना करूनही रुपयातील घसरण न थांबता उलट ती अधिक तीव्र होताना दिसली आहे.

नैराश्याचे कारण नाही ; चिदम्बरम यांचा सांत्वना
चलन बाजारातील ‘भीतीदायकता’ ही अनाठायी असून, रुपयाच्या तीव्र स्वरूपाच्या घसरणीला ही बाब जबाबदार ठरत असल्याचे प्रतिपादन गुरुवारी दिल्लीत पत्रकार परिषदेत अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी केले.  जगातील अन्य अनेक देशांपेक्षा भारताची अर्थस्थिती खूप चांगली असल्याने अतिरिक्त निराशेचे कारणच नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या विनिमयाची नेमका काय स्तर असावा हे सरकार पाहत नसून, चलन बाजारातील अस्थिरता स्वीकारार्ह नसल्याचे अर्थमंत्र्यांनी पुन्हा एकदा सांगितले. रोज नवनव्या नीचांकाला येऊन ठेपणाऱ्या चलनाला स्थिरता देण्याचा प्रयत्न कायम ठेवण्याचेही त्यांनी आश्वासन दिले. एका समाधानकारक टप्प्यावर पोहोचल्यानंतर रुपयाला स्थिरता देण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेने केलेल्या उपाययोजना मागे घेतल्या जातील. भांडवलावर नियंत्रण आणण्याचा सरकारचा कोणताही विचार नसून चालू खात्यातील तूट आवरण्यासाठी संरचनात्मक उपायांची चाचपणी सुरू आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

संकटग्रस्त रुपयावर हास्यविनोदांना बहर
आधी शंभरी कोण गाठणार: डॉलर, पेट्रोल की कांदा?
धोरण लकवा, आर्थिक सुधारणांबाबत राजकीय आळस अथवा बाह्य़ जगतातील विपरीत घडामोडी वगैरे रुपयाच्या धक्कादायक घसरणीची अर्थतज्ज्ञांनी पुढे केलेली कारणे काहीही असोत, जनमाध्यमांमध्ये तोल गमावलेल्या रुपयाची सध्याची अवस्था हा चांगलाच गमतीचा विषय बनला आहे. ऱ्हासमान रुपयावर हिंदी चित्रपटाची शीर्षके आणि गाण्यांवर बेतलेल्या शाब्दिक कोटय़ांची तर ई-पत्रे, फेसबुक आदी माध्यमांवर लाटच उफाळली आहे. या मार्मिक कोटय़ा म्हणजे आजच्या अर्थव्यवस्थेच्या आणि पर्यायाने महागाईने होरपळत असलेल्या जनसामान्यांच्या अगतिकतेवर थोडक्या शब्दात व्यक्त झालेले सणसणीत भाष्यच ठरते.

रुपयावरील टिवटिव नमुने..
* ‘अगले जनम मुझे डॉलर ही किजो : रुपया’
*  ‘रुपयाचे आडनाव काय बरे असावे? अर्थात ‘गिरपडे’!
* ‘सून रहा है तू : डॉलर’, ‘रो रहा हुँ मैं : रुपया’
* ‘कटू वास्तव : जर शून्याचा शोध आपण लावला नसता, तर आज १ रुपया १ पौंड स्टर्लिग इतका असता.’
*‘कोळसा घोटाळ्यातील गहाळ फायलींची संख्या ६० आहे. रुपया नक्कीच काही पावले पुढे आहे.’
* ‘रुपयाही दारिद्रय़रेषेखाली! लवकरच ‘नरेगा’अंतर्गत रोजीस पात्र!!’
* ‘झाडावरून पडत्या फळापेक्षा रुपयाच्या पडझडीचा वेग पाहता, न्यूटन जर हयात असता तर गुरुत्वाकर्षणाची नव्याने व्याख्या करणे त्याला भाग पडले असते.
* ‘रुपयाच्या बचावाचा एकच उपाय, तो म्हणजे त्याने डॉलरला राखी बांधावी आणि ‘भाऊराया रक्षण करा’ म्हणावे.’
*‘पैशाने सुख नक्कीच मिळविता येत नाही, विशेषत: जर हा पैसा रुपयांमध्ये आणि सेन्सेक्समध्ये गुंतला असेल.’
* प्रत्येक दिवशी नव्या विक्रमाची नोंद.. रुपया खरेच चलनांमधील सर्जी बुबका ठरावा!’