मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमती प्रति पिंप ७० डॉलपर्यंत विसावल्याची दखल येथील परकीय चलन विनिमय मंचावर घेतली गेली. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य सप्ताहअखेरच्या एकाच व्यवहारात तब्बल ५० पैशांनी झेपावत ७२.५० पर्यंत पोहोचले.

गेल्या सलग दोन व्यवहारांत परकीय चलन विनिमय मंचावरील व्यवहार बंद होते. शुक्रवारची सुरुवात करताना रुपया ७२.६८ या स्तरावर होता. सत्रात तो ७२.४५ पर्यंत गेला. स्थानिक चलन मंगळवारी ७३ वर होते. रुपयाची गेल्या सलग दोन व्यवहारांतील तेजी ६२ पैशांची राहिली आहे.

अमेरिकेत फेडरल रिझव्‍‌र्हने व्याजदर तूर्त स्थिर ठेवण्याचा घेतलेला निर्णय, आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या घसरलेल्या किमती यांचीही डॉलरच्या तुलनेत रुपया भक्कम होण्यात सकारात्मक भूमिका राहिली.