रिझव्‍‌र्ह बँकेने पतधोरणाचे तिमाही अवलोकन करताना देशाच्या अर्थव्यवस्थेत वाढीच्या (जीडीपी) दराबाबत अंदाज ५.५ टक्क्यांपर्यंत खालावल्याचे स्पष्ट सावट भांडवली बाजारात मंगळवारी पडलेले दिसले. मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक ‘सेन्सेक्स’ने सकाळच्या चांगल्या सुरुवातीनंतर दिवसअखेर २४५ अंशांच्या घसरणीसह बंद झाला.
शेअर बाजारात रिझव्‍‌र्ह बँकेकडून पतधोरण आढाव्याचे निवेदन सादर झाल्यानंतर मोठय़ा प्रमाणात समभाग विक्रीला जोर चढला. देशाच्या अर्थउभारीशी संलग्न तेल आणि वायू क्षेत्र, सार्वजनिक क्षेत्र तसेच व्याजदराबाबत संवेदनशील वाहन उद्योग क्षेत्रातील समभागांची सपाटून विक्री केली गेली. या विक्रीच्या माऱ्यामुळे ‘बीएसई’वरील प्रत्येक १०पैकी सहा समभागांचे भाव लक्षणीय घसरले, तर भागधारकांचे १.१ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणूक मूल्य लयाला गेले.
सेन्सेक्समधील या सलग पाचव्या सत्रातील घसरणीतून, त्याने १९,३४८.३४ अशी तीन आठवडय़ांपूर्वीच्या पातळीवर पुन्हा गटांगळी घेतली आहे. पाच दिवसांत सेन्सेक्सने एकूण ९५० अंश गमावले आहेत.
नफावसुलीने ‘जेट’ची गटांगळी!
जेट-इतिहादस सौद्याला विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ (एफआयपीबी) अखेर सशर्त हिरवा कंदील दाखविल्याचा सकारात्मक परिणाम जेटच्या समभाग मूल्यावर दिसून आला. सकाळच्या सत्रात बीएसई आणि एनएसई या दोन्ही शेअर बाजारांमध्ये जेटच्या समभागाने जवळपास ८ टक्क्यांनी उसळी घेत रु. ४४५ भाव पातळी गाठली. परंतु बाजाराचा कल पाहता, गुंतवणूकदारांकडून नफावसुलीसाठी विक्रीचा फटका या समभागालाही बसला आणि जितके कमावले तितके गमावून दिवसअखेर ७.७० टक्के घसरणीसह हा समभाग रु. ३८० वर बंद झाला. पण सौदा मार्गी लागेल अशा आशेने पडत्या बाजारातही गेल्या चार दिवसांत हा समभाग १३ टक्क्यांनी वधारला आहे.