आंतरराष्‍ट्रीय बाजारात अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची ऐतिहासिक घसरण झाली आहे. रुपयाचा दर पडतो तेव्हा केवळ देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो असे नाही. तर तुमच्या आमच्यासारख्या समान्य लोकांच्या खिशालाही रुपया कमकुवत झाल्याचा फटका बसतो. पण नक्की हा फटका कसा बसतो? रुपयाची किंमत पडल्यावर सामान्यांच्या दैनंदिन व्यवहारात त्याचा काय परिणाम होणार हे जाणून घेण्याचा केलेला हा प्रयत्न…

महागाई वाढण्याची शक्यता

रुपयाच्या तुलनेत डॉलरची किंमत मजबूत झाल्याने कच्च्या तेलांच्या किंमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ होणार. मागील काही दिवसांपासून कच्च्या तेलांच्या किंमतीत घट झाल्याने पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये घट होत होती. मात्र रुपया पडल्यास या किंमती पुन्हा उसळी खाऊ शकतात. तसेच परदेशातून देशात आयात होणाऱ्या तेलासाठी जास्त किंमत मोजावी लागेल. आणि या अधिकच्या किंमतीचा थेट भार सामान्यांच्या खिश्यावर पडेल. सरळ सांगायचे झाले तर कच्च्या तेलांच्या किंमत वाढली तर महागाई वाढेल.

परदेशवारीचा खर्च वाढला

रुपयांची किंमत पडल्याने परदेशात भटकंती करणे महाग होणार आहे. अनेक देशांमध्ये डॉलरमध्ये कारभार चालतो. चलन बदल करुन घेताना डॉलरच्या तुलनेत अधीक भारतीय चलन खर्च होईल.

पदेशात शिक्षण घेणे महागणार

जर तुमची मुले परदेशात शिकत असेल तर रुपयाची किंमत पडल्यास त्याचा थेट फटका तुम्हाला बसू शकतो. कारण भारतीय चलनाची किंमत कमी झाल्यास परदेशातील चलन खर्च करणे महाग ठरु शकते. तेथील शैक्षणिक खर्च, फी, हॉस्टेलचे भाडे आणि चलन बदल करुन घेण्यासाठी जास्त रुपये खर्च करण्याची तयारी ठेवावी लागेल.

आयात खर्च वाढणार

डॉलरची किंमत रुपयाच्या तुलनेत मजबूत झाल्यास परदेशातून येणाऱ्या गोष्टी महाग होतील. भारत जेथे जेथे डॉलरने व्यवहार करतो तिथे जास्त रुपये मोजावे लागणार. म्हणजे भारताचा आयात खर्च वाढणार. आणि नेहमीप्रमाणे याचा थेट फटका सामान्य ग्राहकांना बसणार.

असाही फटका बसणार

> भारताला लागणाऱ्या एकूण पेट्रोलियम पदार्थांपैकी ८० ट्क्के पेट्रोलियम पदार्थ आयात केले जातात

> पेट्रोल पदार्थचे आयात मुल्य वाढणार.

> तेल कंपन्या पेट्रोल-डिझेलच्या देशांतर्गत किंमतींमध्ये अचानक वाढ करतील

> डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्याने कच्च्या मालाचा प्रवास खर्च वाढेल ज्यामुळे महागाई वाढेल

> पेट्रोलियम पदार्थांबरोबरच भारताच्या आयात वस्तूंमध्ये सर्वात मोठा वाटा असणाऱ्या दैनंदिन जीवनातील दोन गोष्टी म्हणजे खाद्य तेल आणि डाळी. अर्थात आयात खर्च वाढल्याने तेल आणि डाळींच्या किंमतीही वाढतील.