अन्नसुरक्षा विधेयकाने सरकारच्या तिजोरीवर ताण पडण्याच्या चिंतेने बाजारविश्वात जबर हादरा दिला. मंगळवारी रुपयाने डॉलरमागे ६६च्या खाली नवी ऐतिहासिक घसरण नोंदविली. चलन एकाच व्यवहारात अभूतपूर्व १९४ पैशांनी आपटले. भांडवली बाजारानेही गेल्या तीन सत्रांतील वाढीला पायबंदच घातला इतकेच नाही तर सेन्सेक्स तब्बल ६०० अंशांची आपटी घेत १८ हजाराच्या  खाली आले. अनेक आघाडीच्या समभागांच्या भावाचा पाळापाचोळा झाला, परिणामी गुंतवणूकदारांच्या १.७० लाख कोटी संपत्तीवर पाणी फिरविले गेले.
चालू खात्यातील तूट सावरण्यासाठी सरकार दफ्तरी उपाययोजना केल्या जात असतानाही अन्नसुरक्षा विधेयकामुळे त्याला यश येणार नाही, या धास्तीपोटी भारतीय चलन मंगळवारी नव्या विक्रमाला पोहोचले. व्यवहाराच्या ६५पासूनच्या सुरुवातीपासून दिवसअखेर चलन ६६च्याही खाली गेले. कालच्या तुलनेत १९४ पैशांनी खालावत स्थिरावलेला त्याचा ६६.२४ हा स्तरच दिवसाचा नीचांक ठरला.
रुपया कालच्या सत्रातही तब्बल ११० पैशांनी घरंगळत ६४.३० पर्यंत गेला होता. तत्पूर्वी शुक्रवारी त्याने किरकोळ, १३५ पैशांची वाढ नोंदविली असली तरी सलग सहा सत्रांत तो सुमारे ६ टक्क्यांनी आपटला होता. मंगळवारी नवा सार्वकालीन नीचांक नोंदविताना चलनाचा प्रवास ६५.०० ते ६६.२४ असा राहिला. भांडवली बाजारातील ६०० अंशांची घसरण नोंदविण्यास कारणीभूत ठरणारी विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची माघार हे चलनाला अधिक अशक्त करू लागले. ६५च्या पुढील ६५.७१/७२ पर्यंतचा तळ अखेरचा असेल असे वाटू लागले असतानाच रुपया दिवसअखेर कालच्या तुलनेत ३.०२ टक्क्यांनी खालावला. भारतीय चलनाचा यापूर्वीचा तळ ६५.५६ असा २२ ऑगस्ट रोजी नोंदला गेला. एकटय़ा ऑगस्ट महिन्यात रुपया १० टक्क्यांनी खालावला आहे. तर चालू वर्षांपासून त्यातील घट ही २० टक्क्यांची राहिली आहे. दरम्यान, डॉलर भक्कम होत असतानाच रुपयाच्या तुलनेत पौंडही १०० पार करत थेट १०३ पर्यंत वधारले. मार्चमध्ये ८० आणि मेमध्ये ८३ रुपये असलेले प्रति पौंड हे ब्रिटिश चलन गेल्या तीन महिन्यांत २१ टक्क्यांनी उंचावले आहे.