X

सात सत्रातील घसरणीला पायबंद

रुपया २६ पैशांनी भक्कम होत सावरला!

रुपया २६ पैशांनी भक्कम होत सावरला!

डॉलरच्या तुलनेत सातत्याने घसरणाऱ्या रुपयाला सावरण्यासाठी अखेर रिझव्‍‌र्ह बँकेने हस्तक्षेप केला. परिणामी स्थानिक चलन सप्ताहअखेर २६ पैशांनी भक्कम होत ७२ च्या वर, ७१.७३ पातळीवर शुक्रवारी स्थिरावले. यामुळे गेल्या सलग सात सत्रातील रुपयातील तब्बल १८९ पैशांच्या अधोगतीला बांध लागला.

गेल्या सलगच्या सातत्यातील घसरणीमुळे रिझव्‍‌र्ह बँकेने चलन गंगाजळीतील अमेरिकी डॉलर खुले करीत रुपयाला शुक्रवारी सावरण्याचा प्रयत्न केला. आंतरराष्ट्रीय स्तरावर खनिज तेलाच्या वाढत्या किमतीनेही उसंत घेतल्याने डॉलर कमकुवत बनला. खनिज तेलदरांमुळे महागाई वाढण्याची शक्यता असून रिझव्‍‌र्ह बँक तिच्या येत्या महिन्यातील पतधोरणात व्याजदरात वाढ करण्याची अटकळ आहे.

परकीय चलन विनिमय मंचावर रुपया २९ ऑगस्टपासून सातत्याने घसरत आहे. डॉलरच्या तुलनेत ७२ नजीकच्या विक्रमी तळापर्यंत रुपयाची घसरण गुरुवारी पोहोचली होती. शुक्रवारच्या व्यवहारातही ७२.०४ पर्यंतचा तळ अनुभवल्यानंतर सत्रअखेर मात्र स्थानिक चलन गुरुवारच्या तुलनेत ऐतिहासिक नीचांकातून बाहेर आले.

रुपया गेल्या वर्षभरात १३ टक्क्यांनी आपटला आहे. डॉलरच्या तुलनेत प्रमुख आशियाई चलनांमध्ये रुपया हा सर्वाधिक कमजोर बनला आहे. तर घसरत्या रुपयामुळे १० वर्षे मुदतीच्या सरकारी रोख्यांनी प्रथमच ८ टक्क्यांवरील परताव्यावर मारली आहे.