डॉलरच्या तुलनेत रुपयाचे वास्तविक मूल्य हे ५० ते ६० च आहे. ६० च्या खाली ते घरंगळायला नको, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी शुक्रवारी मुंबईत केले. आर्थिक राजधानीत निर्यातदारांशी चर्चा करण्यासाठी उपस्थित राहिलेल्या अर्थमंत्र्यांनी या वेळी निर्यात क्षेत्राला दिलासा देण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेशी चर्चेची तयारी दाखविली.
निर्यात क्षेत्राला प्राधान्य क्षेत्राप्रमाणे वागणूक मिळणे गरजेचे असल्याचे मत मांडत चिदम्बरम यांनी कृषी तसेच मध्यम व लघु उद्योजकांप्रमाणेच या क्षेत्रालाही कमी व्याजदरात निधीपुरवठा होणे गरजेचे आहे, असेही नमूद केले.
केंद्रीय अर्थ सचिव अरविंद मायाराम यांनीही याच आठवडय़ात रुपयाचा खरा स्तर ५९ ते ६० असाच आहे, असे सांगितले होते. केंद्रीय अर्थमंत्र्यांनीही तीच री ओढताना रुपयाचे खरे मूल्य ६० पर्यंतच आहे, असे नमूद करत ६० च्या खाली ते घसरायला नको, असे स्पष्ट केले. गेल्या काही सत्रांपासून भारतीय चलन सुधारत असून लवकरच ते अपेक्षित टप्प्यावर स्थिरावेल, अशी आशाही त्यांनी या वेळी व्यक्त केली.
दरम्यान, गेल्या सलग दोन सत्रांपासून तेजी नोंदविणारा रुपया शुक्रवारी ४४ पैशांनी कमकुवत होत ६२.५१ पर्यंत घसरला. परिणामी, तो आठवडय़ाच्या उच्चांकी टप्प्यापासून दुरावला. चालू आर्थिक वर्षांच्या सुरुवातीपासून चलन २० टक्क्यांनी रोडावले असून त्याने गेल्याच महिनाअखेर ६८.८५ असा सार्वकालीन नीचांक नोंदविला आहे. रिझव्‍‌र्ह बँकेचे नवे गव्हर्नर डॉ. राजन यांनी सूत्रे हाती घेतल्यापासून रुपया १० टक्क्यांनी उंचावला आहे.
रुपया पुन्हा नरमला
गेल्या दोन सत्रात ६८ पैशांची भर घालणारे स्थानिक चलन शुक्रवारी पुन्हा नरमले. डॉलरच्या तुलनेत रुपया ४४ पैशांनी घसरत ६२.५१ पर्यंत खाली आला. त्याचा व्यवहारातील नीचांक ६२.५२ राहिला. तर दिवसभरातील त्याची झेप ६१.७६ पर्यंतच जाऊ शकली. चलन गेल्या सलग दोन व्यवहारात वधारलेले राहिले. कालच्या सत्रातही त्यात ३७ पैशांची भर पडली होती. तर  आधीच्या सत्रातील वाढ ३१ पैशांची होती.