गेल्या सलग चार सत्रांपासून घसरणाऱ्या सेन्सेक्सने मंगळवारच्या सुरुवातीच्या व्यवहारात तब्बल २६० अंश झेप घेतली खरी; मात्र अखेर या टप्प्यांपासून ढळताना मुंबई निर्देशांक सोमवारच्या तुलनेत नकारात्मक स्थितीत येऊन ठेपला. त्याच्यासह राष्ट्रीय शेअर बाजारही आता गेल्या नऊ सप्ताहाच्या नीचांकात विसावला आहे.

३०.३० अंश घसरणीसह सेन्सेक्स २८,१६१.७२ वर तर अवघ्या ७.९५ अंश नुकसानासह राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८,५४२.९५ वर थांबला. सलग पाचव्या सत्रातील घसरणीमुळे निफ्टीचा स्तर १८० अंशांनी खाली आला आहे. अगदी शेवटच्या तासाभरात बाजारात समभाग विक्रीचा जोर अनुभवला गेला.
आशियाई विकास बँकेच्या भारताच्या आशावादी आर्थिक विकासाच्या अंदाजावर सत्राच्या सुरुवातीपासून तेजी नोंदविणारा सेन्सेक्स व्यवहारात २८,४५५.३२ अंशांपर्यंत झेपावला. मात्र दुपारनंतर माहिती तंत्रज्ञान, वाहन, बँक समभागांची विक्री झाल्याने सेन्सेक्स २८,१३०.०९ या सत्राच्या तळातही आला.
सेन्सेक्समधील टाटा मोटर्स, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, हीरो मोटोकॉर्प यांचे समभाग मूल्य रोडावले. हक्कभाग विक्रीबाबत बुधवारी संचालक मंडळाची बैठक असलेल्या टाटा मोटर्सचा समभाग सेन्सेक्समधील घसरणीत सर्वात पुढे (-३.२७%) राहिला.
दरम्यानच्या मुंबई शेअर बाजारातील तेजीमुळे एचडीएफसी, भारती एअरटेल, रिलायन्स, डॉ. रेड्डीज् लॅब, विप्रो हे समभाग दिवसअखेरही वाढते राहिले. अब्ज डॉलरच्या सन फार्मा-रेनबॅक्सी विलीनीकरणाला नियामकांची परवानगी मिळालेल्या सन फार्मा-रेनबॅक्सीसह एकूण औषधनिर्माण निर्देशांकही उंचावता राहिला.