22 July 2019

News Flash

बाजार-साप्ताहिकी : निवडणूकपूर्व खरेदीचा माहोल

महाशिवरात्री निमित्त सोमवारी बाजार बंद असल्यामुळे बाजाराचे कामकाज चारच दिवस झाले.

सुधीर जोशी sudhirjoshi23@gmail.com

मागील आठवडय़ात शुक्रवारी अपघातग्रस्त झालेल्या वैमानिकाची स्वदेशात रवानगी करून पाकिस्तानने एक पाऊल मागे टाकल्याने भारत-पाक सीमेवरील तणाव काहीसा हलका झाला होता. परिणामी बाजार अर्ध्या टक्क्याने वर बंद झाला होता. महाशिवरात्री निमित्त सोमवारी बाजार बंद असल्यामुळे बाजाराचे कामकाज चारच दिवस झाले. अपेक्षेप्रमाणे मंगळवारी सकारात्मक सुरुवात झालेल्या बाजाराने तीन दिवस निर्देशांकात वाढ नोंदवत शुक्रवारी थोडी विश्रांती घेतली. तरीही आठवडाभरात मुंबई शेअर बाजाराच्या संवेदनशील निर्देशांकाने ६०७ अंशांची तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने १७१ अंशांची कमाई केली.

मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच बाजारात सुरू झालेल्या तेजीचे वैशिष्टय़ म्हणजे मिडकॅप व स्मॉलकॅप समभागांच्या किमतीत झालेली वाढ होय. सप्टेंबरपासून  बाजार मंदीग्रस्त झाला होता. मिड/ स्मॉल कॅप श्रेणीतील बऱ्या-वाईट सर्वच कंपन्यांचे समभाग खाली आले. निवडणूकपूर्व काळात गुंतवणूकदार साशंक असतो. परंतु कुणाचेही सरकार आले तरी निवडणुकांनंतरच्या वर्षांत मिड व स्मॉल कॅप समभागांमधील गुंतवणुकीवर ५० टक्क्यांहून जास्त नफा मिळतो हा आतापर्यंतचा इतिहास आहे. त्यामुळे सध्याचे आकर्षक मूल्य, व्याजदर कमी होण्याची शक्यता, मोसमी पावसाबाबत आतापर्यंत वर्तविलेले सकारात्मक अंदाज, सरकारकडून उद्योगांना (विशेषत: ग्रामीण) मिळणारे प्रोत्साहन लक्षात घेता निवडणुकींनंतरच्या तेजीसाठी बेगमी करून ठेवायला हा चांगला काळ आहे. बाजारातील भय आणि लोभामुळे झालेले चढ-उतार लक्षात घेऊन, पुरेशा खबरदारीने खरेदी व्हायला हवी.

जेएसडब्ल्यू स्टीलने (बंद भाव २८६ रु.) डय़ुफरको इंटरनॅशनल बरोबर तब्बल ४,९०० कोटींचा करार केला आहे जेणेकरून कंपनी ही रक्कम आगाऊ मिळणार असून त्या बदल्यात पुढील पाच वर्षांत त्याची परतफेड पोलाद निर्यात करून करायची आहे. यात कंपनीचा दुहेरी फायदा आहे. कंपनीचा पोलादाच्या किमती वाढविण्याचाही विचार आहे. सध्याच्या व्यापार युद्धाच्या फलश्रुतीवर पोलाद उद्योगाची भविष्यातील वाटचाल ठरेल.

आयटीसीने (बंद भाव २९२) सिगारेटच्या किंमती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. एकेकाळी फक्त सिगारेटच्या व्यवसायासाठी नावाजलेल्या कंपनीने नित्यउपभोग्य वस्तू व खाद्यपदार्थाच्या बाजारपेठेत शिरकाव करण्यास सुरुवात करून बऱ्यापैकी पाय रोवला आहे. परंतु दिवसेंदिवस घटत जाणाऱ्या सिगारेट व्यवसायासावरील अवलंबन (सध्याचा वाटा ४० टक्के) कमी करण्यासाठी अजून बराच अवकाश आहे. जवळजवळ कर्जमुक्त असणाऱ्या या कंपनीचा समभाग गेले वर्षभर २७० ते ३२० दरम्यान मार्गक्रमण करत आहे. योग्यवेळी यात केलेली गुंतवणूक माफक फायदा देईल.

पुढील आठवडय़ात बाजाराचे लक्ष अमेरिका-चीन व्यापार वाटाघाटी, चीनच्या अर्थव्यवस्थेच्या स्थितीबाबतची आकडेवारी, युरोपियन मध्यवर्ती बँकेची पतआढावा बैठक आणि या बैठकीत व्याजदराबाबत घेतले जाणारे निर्णय यावर राहील.

First Published on March 9, 2019 12:32 am

Web Title: indian stock market stock market weekly indian share market