सेन्सेक्सची ब्रेग्झिटनंतरची मोठी गटांगळी

सीमेवरील युद्धजन्य तणावाच्या भीतीचे सावट गुरुवारी भांडवली बाजारात सुस्पष्टपणे दिसून आले. प्रत्यक्ष ताबा रेषेवरील दहशतवाद्यांच्या अड्डय़ांना हेरून ते ध्वस्त करणाऱ्या भारताकडून झालेल्या हल्ल्यांच्या परिणामी, मुख्य बाजार निर्देशांक – सेन्सेक्सने गुरुवारच्या व्यवहारात गत तीन महिन्यांतील सर्वात मोठी घसरण नोंदविली. ब्रेग्झिट कौलावर प्रतिक्रिया म्हणून उडालेल्या भीतीयुक्त घसरगुंडीनंतरची ही चालू वर्षांतील सेन्सेक्सची दुसरी मोठी घसरण ठरली.

नवी दिल्लीत मध्यरात्री भारतीय सेनेने केलेल्या हल्ल्यांची माहिती देणारी घोषणा झाल्यासरशी बाजारावर भीतीची छाया पसरली. सेन्सेक्सने ५७३ अंशांनी गटांगळी घेत २८ हजारांखाली २७,७१९.९२ अंश या पातळीवर लोळण घेतली. तथापि हे भारत-पाकमधील युद्ध नसून, केवळ दहशतवादविरोधी कारवाई असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर निर्देशांक घसरणीतून सावरलेले दिसले. सेन्सेक्सने पुन्हा २८ हजारापल्याड उसळी घेतली. परंतु पाकिस्तानी सरकारकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आणि अनिश्चितता बळावत गेल्याने ही उभारी तात्पुरती ठरली. गुरुवारचे बाजारातील व्यवहार थंडावले तेव्हा सेन्सेक्स ४६५ अंशांच्या घसरणीसह २७,८२७.५३ अंशांवर स्थिरावला. निफ्टी निर्देशांकानेही या घसरणीत ८,६०० ही महत्त्वाची पातळी सोडून देत, १५३.९० अंश घसरणीसह ८,५९१.२५ या पातळीवर विसावा घेतला. दोन्ही निर्देशांकांमध्ये पावणे दोन टक्क्यांची मोठी घट दिसून आली.

अर्थ व्यवहार सचिव शक्तिकांत दास यांनी ‘दहशतवादविरोधी या निर्णायक स्वरूपाच्या कारवाईतून आर्थिक वृद्धी आणि स्थिरतेलाच चालना मिळेल,’’ असे ट्विट केले. बाजाराच्या मूड पालटाचा त्याने परिणाम साधला परंतु तो अल्पजीवीच ठरला.

बाजारातील घसरण ही इतकी सर्वव्यापी होती की सेन्सेक्स निर्धारित करणाऱ्या ३० पैकी एकाचा अपवाद वगळता सर्वच समभाग गडगडले. केवळ टीसीएसच्या समभागाचे मूल्य ०.४६ टक्क्यांच्या घरात वधारले. निफ्टी निर्देशांकातील ५० पैकी भारती एअरटेल, टीसीएस आणि झी एंटरटेन्मेंट हे तीन समभाग अपवादात्मक कमाई करताना दिसून आले. मुख्यत: स्थावर मालमत्ता, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, धातू, औषधी कंपन्यांचे समभाग, इन्फ्रा क्षेत्रातील समभागांना बाजारात सुरू झालेल्या चौफेर विक्रीचा सर्वाधिक फटका बसला. रुपयाच्या विनिमय मूल्यातील एकदम ४० पैशांच्या घसरणीने आणखी हादरे देत बाजारातील भीतीला खतपाणी घातली.

जागतिक स्तरावर प्रमुख आंतरराष्ट्रीय भांडवली बाजारात मात्र नेमके उलटे चित्र होते. तेल उत्पादक देशांची संघटना ‘ओपेक’ने खनिज तेलाच्या उत्पादनात कपातीचा निर्णय घेतल्याने, आशियाई बाजारांचे निर्देशांकांनी चमकदार उसळी घेतल्याचे आढळून आले.

बाजाराने २.४५ कोटींनी मालमत्ता गमावली..

गुरुवारच्या पडझडीमुळे मुंबई शेअर बाजाराची एकूण मालमत्ता २.४५ लाख कोटी रुपयांनी खाली आली. बाजारातील सूचिबद्ध एकूण कंपन्यांचे बाजारमूल्य एकाच व्यवहारात २,४५,३६०.७२ कोटी रुपयांनी खालावत ते १,०९,५८,६५८ कोटी रुपयांवर आले.

मिड आणि स्मॉल कॅप समभागांची गाळण

बाजारातील बिनीच्या समभागांपेक्षा दुसऱ्या फळीतील मिड कॅप आणि स्मॉल कॅप समभागांना मोठा दणका गुरुवारच्या घसरणीने दिला. मुख्य म्हणजे दिवसाचे व्यवहार सुरू झाले तेव्हा एनएसई आणि बीएसई या दोन्ही बाजारांमधील मिड आणि स्मॉल कॅप निर्देशांकांनी सार्वकालिक उच्चांकी पातळीवर स्वार झाले होते. परंतु पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या अड्डय़ांमध्ये घुसून भारतीय सेनेने केलेल्या कारवाईचे वृत्त येताच, दोन्ही निर्देशांक वरच्या पातळीवरून धाडकन् पाच-सहा टक्क्य़ांनी घरंगळले. परिणामी निफ्टी मिडकॅप निर्देशांक १५,८१८ या विक्रमी शिखरावरून थेट ६०० अंश खाली १५,०९८ या पातळीवर लोळण घेताना दिसला. त्याचप्रमाणे बीएसई स्मॉल कॅप निर्देशांकही १३,१५५ या सार्वकालिक उच्चांकावरून ५२५ अंश खाली १२,५१४ वर कोसळला. दिवसअखेर एनएसईवर १,५३२ घसरणारे समभाग होते, तर केवळ १२६ समभागांचे मूल्य कालच्या तुलनेत वधारलेले दिसून आले. म्हणजे बाजारातील प्रत्येक १३ समभागांमागे फक्त एकाच समभागाचे भाव वाढत असल्याचे केविलवाणे चित्र दिसून आले. बीएसईवरही २,२९७ समभाग घसरणीच्या सूचीत तर केवळ ४४२ समभागांनी वाढ दर्शविल्याचे दिसून आले.

कारगिल युद्धाच्या काळात सेन्सेक्स ३५ टक्के वधारला होता..

शेजारी राष्ट्राबरोबर भारताचे शेवटचे युद्ध म्हणून १९९९ सालच्या कारगिल युद्धाकडे पाहिले जाते. परंतु हे युद्ध प्रारंभीची भीतीदायी प्रतिक्रिया सोडल्यास बाजाराने फारसे मनावर घेतल्याचे आढळून आले नाही. सीमा रेषेपुरते सीमित राहिलेल्या कारगिल युद्धाच्या तीन महिन्यांच्या काळात सेन्सेक्स प्रत्यक्षात ३५ टक्क्यांनी उंचावला होता. ३ मे १९९९ रोजी सुरू झाले तेव्हा सेन्सेक्स ३,३७८ पातळीवर होता आणि २६ जुलैला युद्ध संपुष्टात आले त्यावेळी सेन्सेक्सचा स्तर ४,६२५ अंश असा होता. पुढे घडामोडी कोणते वळण घेतील याबद्दल अनिश्चितता जरी असली तरी थोडी वाट पाहून बाजारातील घसरण ही खरेदीची संधी मानली जावी, असा विश्लेषकांचा होरा आहे. जिओजित बीएनपी परिबा फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे विनोद नायर यांनी खरेदीची इतक्यात घाई नको असा सल्ला देताना, निफ्टी निर्देशांकाची पुढील आधार पातळी ८,५०० असेल, असे स्पष्ट केले आहे. या पातळीवर खरेदीस इच्छुक गुंतवणूकदारांनी नजर ठेवावी, असे त्यांनी सुचविले आहे.