डॉलरच्या तुलनेत घसरलेला रुपया भारतीय पर्यटन व्यवसायाच्या पथ्यावरच पडला आहे. एका अमेरिकन चलनासाठी ६५ रुपयांपर्यंत मोजावे लागणाऱ्या रकमेपोटी भारतीयांनी देशांतर्गत प्रसिद्ध स्थळांना भेट देणे पसंत केले आहे.
मेअखेरपासून डॉलरच्या तुलनेत स्थानिक चलनाच्या होत असलेल्या घसरणीने ऑगस्टपर्यंत ६९ पर्यंत विक्रमी गटांगळी घेतली. यानंतर रिझव्‍‌र्ह बँकेने उचललेल्या पावलांमुळे रुपयाची घसरण काहीशी थोपविली गेली. मात्र चालू महिन्याच्या सुरुवातीपासून चलन पुन्हा कमकुवत होऊ लागले आहे. सेन्सेक्स सर्वोच्च स्तराला प्रवास करत असताना भारतीय रुपयात मात्र धास्ती निर्माण केली.
अशा विदेशी चलनाचा व्यवहार होत असलेल्या विदेशांमध्ये महागडय़ा डॉलरमुळे प्रवासासह निवास, खानपान आदी सेवा अधिक किंमत मोजून घ्यावी लागत आहे. जोडीला वाढत्या इंधनदरांमुळे गेल्या काही दिवसांमध्ये हवाई प्रवासही महागला आहे. परिणामी भारतीयांचा विदेशभ्रमणाचा मोह कमी झाला असून स्थानिक पर्यटनस्थळांकडे त्यांचा ओढा वाढला आहे.
प्रवास व्यवस्था हाताळणाऱ्या ‘आरजू डॉट कॉम’चे अमलेंदू पुरंदरे यांनी याबाबत ‘लोकसत्ता’ला सांगितले की, यंदाच्या ऑगस्टपासून येथील पर्यटनस्थळांना भेट देण्याच्या प्रमाणात १५ टक्क्यांनी वाढ नोंदली जात आहे. आमच्याकडे असलेल्या नोंदीनुसार, एरवी महिन्याला विदेशात जाणाऱ्यांचे प्रमाण २०० पर्यंत असायचे. भारतीय पर्यटनस्थळांना भेट देण्याच्या प्रमाणात वाढलेला ओघ सकारात्मक असून प्रसंगी अशा स्थळांना अधिक विकसित करण्याचे खरे आव्हान असल्याचेही पुरंदरे म्हणाले.
एकूणच आर्थिक मंदीमुळे गेल्या काही दिवसांमध्ये भारतातील हॉटेलमधील पर्यटकांची संख्या रोडावली होती. गेल्या वर्षांच्या तुलनेत तर ती कमालीची कमी आहे. मात्र वर्षअखेपर्यंत ही स्थिती समान राहिल, असा विश्वासही पुरंदरे यांनी व्यक्त केला.
देशांतर्गत पर्यटन तुलनेने स्वस्त होत असल्याने येथील पर्यटन विकासाला चालना देण्याची आवश्यकता पुरंदरे यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रासारख्या मोठा सागरी किनारा लाभलेल्या भागात यादृष्टीने धोरणकत्यरंनी पावले उचलण्याचे प्रतिपादनही त्यांनी केले. तुलनेने शेजारील राज्यांमध्ये पर्यटन विकासासाठी खास उपक्रम राबविले जात असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
वर्षअखेरनिमित्ताने पुन्हा एकदा पर्यटन क्षेत्राला चालना मिळण्याची शक्यता असून दिवाळीनंतर पर्यटन व्यवसायातील कंपन्या, संस्था यांच्याकडील विचारणा वाढली आहे. त्याचबरोबर दिर्घकालात प्रवास नियोजन करणे आर्थिकदृष्टय़ा लाभकारक ठरणारे, चलन नुकसान तफावत कमी करणारे होत असल्याने पुढील वर्षांतील ऐन उन्हाळ्यातील प्रवास बेतही आखले जाऊ लागले आहेत.
देशांतर्गत पर्यटनवाढीमुळे एकूणच या क्षेत्राची वाढ ८ ते १० टक्के दराने होण्याची आशा या उद्योगाला आहे. गेल्या काही वर्षांंमध्ये या उद्योगाचा विकास मंदावला आहे. आदरातिथ्यशी निगडित इतर व्यवसायावरही अवलंबित्व असणाऱ्या या
उद्योगाचा देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात सिंहाचा वाटा आहे.
भारतीय तरुणांना वर्षांतून एकदा तरी विदेशभ्रमण हवे
‘थॉमस कुक’ या आघाडीच्या पर्यटन संस्थेने केलेल्या ताज्या सर्वेक्षणात, अर्थव्यवस्था आणि चलन हे मुद्दे ७२ टके तरुण भारतीयांसाठी प्रवास, पर्यटनाकरिता महत्त्वाचे ठरतात. प्रवासाशी निगडित राहण्यासाठी ऑनलाइनचा पर्याय तरुणांना अधिक सोयीचा वाटतो. ४३ टक्के तरुणांना वर्षांतून एकदा तरी आंतरराष्ट्रीय प्रवास करायची इच्छा असते. मोठय़ा कालावधीच्या भ्रमणापेक्षा दोनदा कमी अंतरासाठी प्रवास करायला ६६ टक्के तरुण भारतीयांना आवडते. वार्षिक उत्पन्नाच्या १५ टक्के रक्कम प्रवासावर खर्च करण्याची इच्छा ६२ टक्के तरुण प्रवाशांनी व्यक्त केली आहे.
कोकण पर्यटनाच्या प्रतिकृतीची स्पर्धा
कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी तेथील पर्यटन स्थळांच्या प्रतिकृती बनविण्याची अनोखी स्पर्धा कोकण भूमी प्रतिष्टानने आयोजित केली आहे. याअंतर्गत कोकणातील धबधबे, किल्ले, मंदिरे, जलदुर्ग यांच्या प्रतिकृती बनविता येतील. प्रतिष्ठानने यासाठी डिसेंबरमध्ये नवी मुंबई येथे ग्लोबल कोकण महोत्सवही आयोजित केला आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी ९९३०६५९७९९ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
लंडन महोत्सवात एमटीडीसीची भुरळ
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने लंडन येथील ‘वर्ल्ड ट्रॅव्हल मार्केट’मध्ये सहभाग घेत पैठणी, वाइन्स, समुद्र किनारे, बॉलिवूड यावर टाकलेल्या प्रकाशझोताने तमाम दर्शकांवर भुरळ पाडली. आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय अशा या महोत्सवात भारताकडून एमटीडीसीव्यतिरिक्त वीणा वर्ल्ड, कामत हॉटेल्स, ग्लोबल कोकण, बॉलिवूड टूर्स, बोधीन होलिस्टिक हिलिंग आदी कंपन्या सहभागी झाल्या होत्या.
पर्यटन-खानपानची नवी सांगड : मास्टरशेफ ट्रॅव्हल
पर्यटन आणि खानपान यांचे घट्ट नाते लक्षात घेऊन कॉक्स अ‍ॅण्ड किंग्ज्सने मास्टरशेफ ट्रॅव्हल ही नवी उपशाखा सुरू केली आहे. भ्रमंतीदरम्यान पर्यटकांना विविध खाद्यान्नाची चव अनुभवता यावी यासाठी सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत स्थानिक शेफना प्रोत्साहित केले जाणार आहे. याद्वारे विविध लोकप्रिय खाद्य, पेय यांची अनुभूतीही पर्यटकांना मिळू शकेल. याअंतर्गत कंपनीने विशेष पॅकेजही जाहीर केले आहेत.