पर्यावरणस्नेही आणि भविष्याचा अपरिहार्य पर्याय मानल्या गेलेल्या विद्युत वाहनांच्या १०० टक्के वापराचे लक्ष्य भारतासाठी अद्याप कैक योजने दूर असले तरी त्या दिशेने पडलेली पहिली पावलेही खूपच सकारात्मक असल्याचे ‘सोसायटी ऑफ मॅन्युफॅक्चर्स ऑफ इलेक्ट्रिक व्हेईकल (एसएमईव्ही)’ या विद्युत वाहन उत्पादकांच्या संघटनेने पुढे आणलेल्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. सरलेल्या २०१६-१७ वर्षांत पारंपरिक इंधन न वापरणाऱ्या पूर्णपणे विद्युत दुचाकी, चारचाकींची २५ हजारांच्या घरात विक्री झाल्याचे आणि देशात सर्वाधिक वापर करणाऱ्या पाच राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

सरलेल्या २०१६-१७ आर्थिक वर्षांत महाराष्ट्रात १९२६ ई-वाहने विकली गेली. या आघाडीवर देशातील अव्वल पाच राज्यांत महाराष्ट्र पाचव्या स्थानी आहे. सर्वाधिक ४३३० वाहने गुजरातमध्ये, त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये २,८४६, उत्तर प्रदेशात २,४६७, तर राजस्थानमध्ये २,३८८ वाहने विकली गेली आहेत. विक्री झालेल्या ई-वाहनांत ९२ टक्के या दुचाकी आहेत, तर चार चाकी वाहने केवळ आठ टक्के इतकी आहेत. हवेच्या भयंकर प्रदूषणाने त्रस्त दिल्ली राज्याची ई-वाहनांच्या स्वीकारार्हतेत अग्रणी भूमिका राहिली आहे; परंतु २०१६-१७ मधील विक्रीच्या या पाहणीत दिल्ली १०७२ ई-वाहनांच्या आकडेवारीसह सातव्या स्थानावर घरंगळले आहे.

ई-वाहनांच्या स्वीकारार्हतेला चालना देण्यासाठी राज्य सरकार आणि विविध उद्योग संघटनांच्या समन्वयातून कृतीची नितांत गरज असल्याचे एसएमईव्हीचे महासंचालक सोहिंदर गिल यांनी मत व्यक्त केले. वाहन उत्पादकांना अनुदान सवलतीचा भिजत पडलेला प्रश्न आणि कमकुवत पायाभूत सुविधा खूप मोठा अडसर असल्याचे त्यांनी मान्य केले.