अमेरिकेने पुन्हा एकदा भारतावर आसूड ओढले आहे. फेडरल हवाई व्यवस्थापनाने भारताचे हवाई क्षेत्र सुरक्षितेच्या दृष्टीने पाकिस्तानपेक्षाही सुमार असल्याचा दाखला नोंदविला आहे. हवाई सुरक्षितेसाठी दिले जाणारे मानांकन दोनवर आणून ठेवतानाच अमेरिकेच्या व्यवस्थापनाने भारताला आता याबाबत घाना, बांगलादेश यांच्या पंगतीत बसविले आहे.
सुरक्षितेच्या दृष्टीने योग्य अशा हवाई प्रवासासाठी अमेरिकन फेडरल हवाई व्यवस्थापनाचे मानांकन महत्त्वाचे मानले जाते. संयुक्त राष्ट्र संघाने हवाई सुरक्षाविषयक नेमून दिलेल्या आंतरराष्ट्रीय नागरी हवाई संघटनेच्या मानकानुसार भारताचे हवाई क्षेत्र योग्य नसल्याचे या व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.
व्यवस्थापनाने सप्टेंबर आणि डिसेंबर २०१३ मध्ये केलेल्या या सुरक्षाविषयक परीक्षणामुळे भारतातील हवाई कंपन्यांमध्येही अस्वस्थता पसरली आहे. फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या प्रवास हंगामावर संकटछाया पडली आहे. अमेरिकेच्या या शेऱ्यामुळे भारतीय कंपन्यांचे जागतिक महासत्तेला होणारे उड्डाणही अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सध्या दाट धुक्यापोटी अनेक उड्डाणे स्थगित करावे लागणाऱ्या भारतीय हवाई कंपन्यांना येथील नियामकाच्या कारवाईच्या बडग्यालाही सामोरे जावे लागत आहे. त्यातच फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या ऐन प्रवास हंगामासाठी अनेक कंपन्या तिकिटांचे दर निम्म्यावर आणून स्पर्धेत राहण्याचा प्रयत्न करीत आहेत.
सार्वजनिक एअर इंडिया (शिकागो व न्यूयॉर्क) व खासगी जेट एअरवेजसारख्या (केवळ न्यूयॉर्क) कंपन्यांची अधिकतर उड्डाणे अमेरिकेत होतात. पैकी एअर इंडिया आठवडय़ाला २१ तर जेट एअरवेज ७ उड्डाणे अमेरिकेसाठी करते.
भारताबाबत असा प्रकार पहिल्यांदाच घडला असून वरची श्रेणी पुन्हा प्राप्त करण्यास आणखी सहा-आठ महिने जाण्याची शक्यता आहे. भारताबरोबर शेजारचा पाकिस्तान सुरक्षा श्रेणीत पहिल्या तर बांगलादेश दुसऱ्या श्रेणीत आहे.
आश्चर्यकारक, निराशादायी..
अमेरिकेच्या या निर्णयाबद्दल आश्चर्य आहेच, मोठी निराशाही झाली आहे. आम्ही (भारत) सध्या ९५ टक्क्यांपर्यंत हवाई सुरक्षिततेची पूर्तता करीत आहोत. हवाई महासंचालनालयदेखील सुरक्षाविषयक विविध ३३ घटकांचा अभ्यास करीतच आहे. या विषयावर अमेरिकेच्या व्यवस्थापनाबरोबर चर्चा करण्यात येणार असून सुरक्षाविषयक वरची श्रेणी नक्कीच नव्या परीक्षणात प्राप्त होईल.
अजित सिंह, केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्री