संगणकाधारित माहितीचे संकलन, जतन व विश्लेषणाच्या केंद्रांच्या (डेटा सेंटर) परिचालनातील अग्रणी नेटमॅजिक या कंपनीने मुंबईतील आपले पाचवे आणि देशातील सर्वात मोठे असे डेटा सेंटर सुरू करीत असल्याची बुधवारी येथे घोषणा केली.
मुंबईच्या उपनगरात चांदिवली येथे स्वमालकीच्या पाच मजली इमारतीत, तब्बल ३०,००० चौरस फूट चटईक्षेत्र असलेल्या या नवीन डेटा सेंटरची भर पडल्याने, कंपनीच्या देशातील एकूण नऊ डेटा सेंटर्सची एकूण क्षमता व चटई क्षेत्र सहा लाख चौरस फुटांपर्यंत विस्तारली आहे. उल्लेखनीय म्हणजे या महाकाय केंद्रातील ४० टक्के आसनक्षमतेची विधिवत उद्घाटनापूर्वीच विक्रीची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे, अशी माहिती नेटमॅजिकचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ शरद सांघी यांनी दिली. ई-व्यापार क्षेत्रातील कंपन्यांच्या जवळपास ८० टक्के उलाढालींचे व्यवस्थापन व माहिती विश्लेषण, माध्यम कंपन्या, ग्राहकोपयोगी उत्पादने व सेवा कंपन्या तसेच पारंपरिक निर्माण उद्योगातील अनेक बडय़ा कंपन्यांना नेटमॅजिककडून सेवा दिली जात असून, नवीन केंद्रही अनेक नवउद्यमी (स्टार्ट-अप्स) कंपन्यांचा मुख्य कणा बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नेटमॅजिक ही एनटीटी कम्युनिकेशन्स या जपानी उद्योगसमूहातील एक उपकंपनी असून, एनटीटीकडून जगभरात विविध देशांत १४० डेटा सेंटर सध्या चालविली जात आहेत. एनटीटी कम्युनिकेशन्स समूहाने या नव्या केंद्रासाठी सुमारे ७०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. या प्रसंगी एनटीटी कम्युनिकेशन्सचे अध्यक्ष व मुख्याधिकारी तेत्स्युया शोजी हेही उपस्थित होते. त्यांच्या कंपनीसाठी भारत ही एक महत्त्वाची बाजारपेठ राहिली आहे आणि म्हणूनच येथे २०१२ सालापासून २८ अब्ज येन (सुमारे १५०० कोटी रुपये) गुंतवणूक आपण येथे केली असून, यापुढे नवीन मालमत्तांचे अधिग्रहण, प्रस्थापित कंपन्यांच्या संपादनाच्या संधी पाहून गुंतवणुकीचा हा दर कायम राखला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. आगामी काळात मुंबई, बंगळुरू आणि नोएडा या ठिकाणी आणखी तीन डेटा सेंटर सुरू करण्याचे कंपनीचे नियोजन असल्याचे सांघी यांनी स्पष्ट केले.