18 October 2018

News Flash

‘बिटकॉइन’धारकांना तिसरा इशारा

आभासी चलनाची उलाढाल साडेआठ लाखांवर

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

आभासी चलनाची उलाढाल साडेआठ लाखांवर

जगभरात धुमाकूळ घालत असलेले आभासी चलन बिटकॉइनने बुधवारी प्रत्येकी १३ हजार अमेरिकी डॉलरचे (सुमारे ८.३० लाख रुपये) मूल्य गाठले. गत वर्षभरातील ही दसपटीने (१००० टक्के) झालेली मूल्यवाढ आहे. वित्तीय जगतात इतक्या झपाटय़ाने मूल्यवर्धन अभावानेच होत असते आणि हा ताणलेला फुगा कधीही फुटून स्फोट घडवू शकतो, असा तज्ज्ञ विश्लेषकांचा सल्ला आहे. हाच चिंतेचा धागा पकडून भारतात पतव्यवस्थेची नियंत्रक असलेल्या रिझव्‍‌र्ह बँकेनेही मंगळवारी या आभासी चलनातील गुंतवणूकदारांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. गत चार वर्षांत भारतात दिला गेलेला हा तिसरा इशारा आहे.

कोणत्याही आभासी चलनाचा देवघेवीचे व्यवहार अथवा विनिमयाचे माध्यम म्हणून वापर भारतात अवैध असल्याचे मध्यवर्ती बँकेने सर्वप्रथम २४ डिसेंबर २०१३ रोजी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले.

आभासी चलनातून असे व्यवहार करणाऱ्या कोणत्याही कंपनीने नियंत्रकाकडून कोणताही परवाना मिळविलेला नाही, नोंदणी केलेली नाही अथवा तसा कसलाही अधिकारही मिळविलेला नाही, असा त्यावेळी दिल्या गेलेल्या इशाऱ्याचा पुनरुच्चार १ फेब्रुवारी २०१७ रोजी काढलेल्या पत्रकातून पुन्हा एकदा केला गेला.

त्यानंतर अलीकडच्या काळातील बिटकॉइनच्या मूल्याचा सुरू असलेल्या झपाटय़ाच्या पाश्र्वभूमीवर मंगळवार, ५ डिसेंबर २०१७ रोजी रिझव्‍‌र्ह बँकेने तिसरे इशारा पत्रक प्रसिद्ध केले. आधीच्या प्रसिद्धीपत्रकातून व्यक्त केलेल्या चिंतेला त्यातून पुन्हा एकदा अधोरेखित केले गेले आहे.

भारतातून या आभासी चलनातील गुंतवणुकीची व्याप्ती आणि प्रमाण नेमके किती याचा कोणताही तपशील रिझव्‍‌र्ह बँकेने दिलेला नाही. बिटकॉइनचे व्यवहार करणाऱ्या कोणत्याही संस्था अथवा कंपन्या नोंदणीकृत नसल्याने तसा तपशील तिच्याकडे उपलब्ध असण्याचा संभवही नाही.

त्यामुळे कोणीही गुंतवणूकदार अथवा ट्रेडर आभासी चलनाच्या व्यवहारांत व्यस्त असतील, तर तसे व्यवहार त्यांनी स्व-जोखमेवरच करावेत, असेही मध्यवर्ती बँकेने स्पष्ट केले आहे. अप्रत्यक्षपणे अशा व्यवहारांतून गुंतलेला पैसा गमावण्याचाच धोका असल्याचे यातून सूचित केले गेले आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेने सूचित केलेले धोके

  • आभासी चलन हे डिजिटल स्वरूपातील असल्याने आणि डिजिटल स्वरूपातच ई-बटव्यांमध्ये त्यांचे जतन केले जात असल्याने, हॅकिंग, पासवर्ड गहाळ होणे, डेटा-चोरी, मालवेअर व तत्सम सायबर हल्ल्यांचा त्यांना कायम धोका आहे.
  • कोणत्याही मध्यवर्ती नियंत्रक संस्थेविना, नियम-कानूंच्या आकृतिबंधाविना या चलनातील देयक व्यवहार व्यक्तिपरत्वे विश्वासाच्या आधारे होतात. परिणामी, त्या संबंधाने समस्या, वादंगांवर निवाडय़ाची आणि नुकसानभरपाईचीही हमी नाही.
  • आभासी चलनाच्या मूल्याची पुष्टी करतील अशी कोणतीही अंतर्निहित मालमत्ता नाही. त्यामुळे त्यांचे मूल्यवर्धन हे केवळ सट्टय़ातूनच होत असते. वादळी चढ-उताराने मूल्य जसे झपाटय़ाने वाढते तसेच अकस्मात मूल्यऱ्हासाची शक्यता नाकारता येत नाही.
  • आभासी चलनाचा विनिमयाचे माध्यम म्हणून वापर हा अवैध आणि बेकायदेशीर गोष्टींसाठी सर्रास सुरू असल्याचे आढळले आहे. सगळे व्यवहार नियंत्रणरहित, प्रति पक्षाबद्दल कसलीही माहिती नसताना अनामिक होत असल्याने, काळ्या पैशाला प्रतिबंध करणाऱ्या देशातील कायद्यांचा भंग केल्याचा दोषारोप नाहक वापरकर्त्यांवरही येईल.

First Published on December 7, 2017 1:38 am

Web Title: indias central bank warns beware of bitcoin