भारतातील सर्वात मोठी मद्यनिर्मिती कंपनी युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड या कंपनीत हिना नागराजन यांची कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. गुरूवारी कंपनीनं याबाबत माहिती दिली. सध्या आनंद कृपालू हे या पदावर कार्यरत आहेत. आता आनंद कृपालू यांची जागा या हिना नागराजन या घेणार आहेत. या कंपनीच्या मुख्य कार्यकारी पदी नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत.

आनंद कृपालू हे २०१४ या कंपनीत रूजू झाले होते. ते युनाटेड स्पिरिट्स लिमिटेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक पदी ३० जून २०२१ पर्यंत कायम राहणार आहेत. हिना नागराजन या १ जुलै २०२१ पासून कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालकपदाची सूत्रं स्वीकारतील, असं कंपनीकडून सांगण्यात आलं.

“आनंद कृपालू यांनी आपल्या कार्यकाळात कंपनीमध्ये बदल घडवले आणि त्यांच्या कार्यकाळात कंपनीची मोठी प्रगतीही झाली. या दरम्यान कंपनीला मोठा फायदाही झाला,” असं कंपनीकडून सांगण्यात आलं. हिना नागराजन या सध्या USL ची मूळ कंपनी जियाजिओ मध्ये आफ्रिकन बाजार विभागाच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत आहे. डियाजिओमध्ये पद सांभाळण्यापूर्वी त्यांनी नेस्ले इंडिया, मॅरी के या कंपन्यांमध्येही व्यवस्थापकीय संचालक पदाची धुरा सांभाळली आहे. २०१८ मध्ये त्या डियाजिओमध्ये रूजू झाल्या होत्या. या ठिकाणी त्यांनी आपएमचं नेतृत्व केलं.